Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झाला आहे. 

Updated: Mar 17, 2022, 06:54 PM IST
Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी? title=
संग्रहित छाया

मास्को : Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झालाय. पुतीन यांची वक्रदृष्टी पूर्व युरोवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेमप्लॅन उघड केला आहे. 

युक्रेन जिंकल्यावर पुतीन यांची घोडदौड इथेच थांबेल का ? पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? पुतीन यांचं पुढचं टार्गेट काय? असे अनेक प्रश्न जगाला पडले आहेत. या प्रश्नांचे उत्तर रशियाच्याच एका अधिकाऱ्याने एका टीव्ही शोमध्ये देऊन टाकले. रशियन वायुसेनेचे माजी कर्नल इगोर कोरोटचेंको यांनी पुतीन यांचे पुढचे डावपेचच जाहीर केलेत. 

पुतीनचा आता पूर्व युरोपवर डोळा? 

नाटोने लॅतव्हिया, इस्टोनिया, लिथुआनिया या देशांत मोठा युद्धाभ्यास सुरू केलाय. त्यामुळे पुतीन नाटोला शह देण्यासाठी या तीन देशांवर हल्ला करू शकतात असं कोरोटचेंको यांनी म्हटलंय. तसंच स्वीडनच्याही काही भागांवर कब्जा करण्याचा पुतीन यांचा इरादा असल्याचं त्यांनी म्हटले आहे. एक वॉर प्लॅनचा नकाशा कोरोटचेंको यांनी दाखवला. त्यात नाटो फौजांची पूर्व युरोपातली तैनाती स्पष्ट दिसत होती. 

रशियाचं पुढचे टार्गेट बाल्टीक राष्ट्रं ? 

सुरूवातीला नाटोची रडार सिस्टीम नष्ट करण्याचा प्लॅन आखला जाईल. त्यामुळे रशियन फौजांची आगेकूच नाटोला समजणार नाही. त्यानंतर स्विडीश आयलँड गोटलँडवर रशियन लष्करी जेट्स उतरतील. तिथे एस 400 सह अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि अँटी शिप सिस्टीम लावली जाईल. कलीननग्राड शहर मागे टाकत रशियन सैनिक सुवाल्की कॉरिडॉर ब्लॉक करतील. त्यानंतर रशियन फौजांचं टार्गेट असेल बाल्टीकचा समुद्र. बाल्टीक समुद्रातल्या कॅनडा, अमेरिका, जर्मनी, ब्रिटनच्या सैन्याला रशियन सैन्य घेराव घालेल. 

नाटोत सहभागी होऊ नका, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील अशी धमकी पुतीन यांनी याआधीच स्वीडनला दिलीय. इस्टोनिया, लॅतव्हिया, लिथुआनिया हे तीनही देश सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यावर युक्रेनप्रमाणेच स्वतंत्र झाले होते. आता कोरोटचेंको यांच्या मताप्रमाणे खरंच रशिया पूर्व युरोपवर आपली वक्रदृष्टी वळवणार की युक्रेन बेचिराख करून नाटोला इशारा देत माघारी परतणार याकडे जगाचं लक्ष लागले आहे.