MICROSOFT अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला

2014 पासून नडेला मायक्रोसॉफ्टचे (Microsoft Corporation) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Updated: Jun 17, 2021, 06:03 PM IST
MICROSOFT अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला  title=

नवी दिल्ली - तंत्रज्ञान विश्वात दिग्गज असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (Microsoft Corporation)च्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे सत्या नडेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 पासून नडेला मायक्रोसॉफ्टचे (Microsoft Corporation) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 2014 मध्येच जॉन थॉम्पसन यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्याकडून कंपनीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला होता. आता त्यांच्याकडून हा पदभार सत्या नडेला यांच्याकडे आला असून, थॉम्पसन यांच्याकडे लीड इंडिपेंडंट डायरेक्टर (Lead Independent Director) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

हैदराबादमध्ये झालं प्राथमिक शिक्षण

सत्या नडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये 1967 साली झाला. त्यांचे वडिल प्रशासकिय अधिकारी तर आई संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या. सत्या नाडेला यांचं सुरुवातीचं शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झालं. 1988 मध्ये त्यांनी मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजिनिअरिंगचा अभ्यास केला आणि त्यानंतर कॉम्प्यूटर सायन्समधून एम ए पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. 1996 मध्ये त्यांनी शिकागोतल्या बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. 

मायक्रोसॉफ्ट कंपनीला नेलं उंचीवर

2014मध्ये सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीची धूरा सांभाळली. जेव्हा त्यांनी हे पद स्विकारलं त्यावेळी कंपनी अनेक संकटातून जात होती. नडेला यांनी केवळ कंपनीला संकटातून बाहेर काढलं नाही तर नवी उर्जा देण्याचं काम केलं. 2014 मध्ये नडेला सीईओ झाले, त्या वेळी अॅपल (Apple) आणि गुगल (Google) या त्यांच्या स्पर्धक कंपन्यांनी मोबाइलवर लक्ष केंद्रित करून आघाडी घेतली होती. त्या स्पर्धेत कंपनीला आणण्याचं काम नाडेला यांनी केलं. त्यांनी क्लाउड कंप्यूटिंग, मोबाइल अॅप्लिकेशनंस आणि आर्टिफिशियल इंटेलीजेंसवर लक्ष केंद्रीत केलं. त्याचबरोबर ऑफिस सॉफ्टवेअरलाही पुढे नेलं. नाडेला यांच्या धोरणांमुळे 2019 मध्ये मायक्रोसॉफ्टला जवळपास 316 कोटी रुपयांचा लाभ झाला. जो गत वर्षाच्या तुलनेत तब्बल 65 टक्के अधिक होता. 

क्लाऊड कम्प्युटिंगला प्राधान्य

सत्या नडेला यांनी क्लाउड कम्प्युटिंगला प्राधान्य दिलं. त्यांचं हे पाऊल कंपनीच्या वाढीसाठी साह्यभूत ठरलं. म्हणूनच त्यांना 'क्लाऊड गुरु' असंही म्हटलं जातं. त्यांनी डेटा सेंटर्समधून सॉफ्टवेअर्स आणि सर्व्हिसेस रेंटवर उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला. शिवाय त्यांनी कंपनीत मोठे संघटनात्मक बदल केले. 

सत्या नडेला यांचं व्यवसायाबद्दलचं सखोल ज्ञान योग्य धोरणात्मक संधी स्वीकारण्यासाठी आणि महत्त्वाच्या जोखीम ओळखण्यासाठी कंपनीला उपयोग होईल,' असं मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नडेला हे क्रिकेट आणि फुटबॉलचेही मोठे चाहते आहेत.