संक्रमण रोखण्यासाठी मॉलमध्ये पायाने बोलवा लिफ्ट

संक्रमण रोखण्यासाठी हटके पर्याय 

Updated: May 23, 2020, 08:42 AM IST
संक्रमण रोखण्यासाठी मॉलमध्ये पायाने बोलवा लिफ्ट  title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. थायलंडमध्येही लॉकडाऊनचे नियम शिथिल करून दैनंदिन जीवन काहीशा प्रमाणात सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढंच नव्हे तर मॉल सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. मात्र तिथे सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मॉल्समध्ये अनेक ठिकाणी प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझेशन केलं जाणार आहे. मास्क लावून फिरणं बंधनकारक असणार आहे. तसेच अंतर ठेवून टेबलवर बसण्याचे नवे नियम लागू केले आहे. याबरोबरच एका मॉलमध्ये ग्राहकांना लिफ्टमध्ये बटणांच्या माध्यमातून संपर्क होऊ नये म्हणून चक्क बटणांऐवजी थेट पेडल्सची सोय करण्यात आली आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलंय. 

सीकॉन स्क्वेअर मॉल लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आला आहे. या मॉलमध्ये लिफ्टच्या आत आणि बाहेर पॅडल लावण्यात आले आहे. सुरूवातीला मॉलमध्ये येणारे नागरिक गोंधळले. पण जेव्हा त्यांना या मागचं कारण कळलं तेव्हा त्यांनी मॉलच्या अधिकाऱ्यांच कौतुक केलं. 

लिफ्टचा वापर करताना बटणाला हात लावला जाऊ नये याकरता ही शक्कल लढवण्यात आली आहे. यामुळे मॉलमध्ये नागरिकांनी आपण सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली. आता नागरिक एलिवेटरला दाबण्यासाठी हाताचा नाही तर पायाचा उपयोग करतात. 

थायलंडमध्ये मार्चनंतर पहिल्यांदा रविवार शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोर सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल करण्याची ही दुसरी वेळ आहे. आतापर्यंत थायलंडमध्ये ३,०४३ कोरोनाबाधित आढळले असून ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे.