पाकिस्तानला मोठा झटका, अमेरिकेने तोडली लष्करी रसद

पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे थांबवले 

Updated: Aug 11, 2018, 08:46 AM IST
पाकिस्तानला मोठा झटका, अमेरिकेने तोडली लष्करी रसद title=

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकी प्रशासनाने पाकिस्तानला पुरवण्यात येणाऱ्या लष्करी रसदीत लक्षणीय कपात केली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण व शैक्षणिक उपक्रम थांबवण्यात आले आहेत. तसेच पाकच्या लष्करी प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या निधीवरही टाच आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा सहकार्य म्हणून पाकिस्तानला देण्यात येणारी १.१५ अब्ज डॉलरची मदत मागे घेतली होती. दहशतवाद रोखण्यात पाकला आलेल्या अपयशामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले होते. 

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या नव्या निर्णयावर अमेरिका व पाकिस्तान दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे पाकिस्तान चीन व रशियाच्या आणखीनच जवळ जाण्यास उद्युक्त होईल. त्यामुळे अमेरिकी प्रशासनाचा हा निर्णय खूपच संकुचित आणि लघुदृष्टीचा आहे. यामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडतील, अशी भीती अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील अमेरिकेची माजी विशेष प्रतिनिधी डॅन फेल्डमन यांनी व्यक्त केली.