अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बायडेन यांची जुगलबंदी पाहायला मिळणार

जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना अमेरिकेतही कोरोनाचे मोठे संकट आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.  

Updated: Jul 28, 2020, 12:21 PM IST
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बायडेन यांची जुगलबंदी पाहायला मिळणार   title=

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना अमेरिकेतही कोरोनाचे मोठे संकट आहे. मात्र, त्याचवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. कोरोनाचे संकट असताना  जागतिक आरोग्य संघटना यांच्याशी थेट नातेसंबंध संपुष्टात आणलेत. परदेशी नागरिकांच्या व्हिसाबाबत कडक निर्णय घेतला आहे. तसेच अमेरिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्हिसाबाबत काही निर्बंधही लादले आहेत. त्यामुळे हे प्रश्न राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत चर्चेचे विषय आहेत. त्यातच आता निवडणुकीतील पहिले डिबेट पुढील महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रणसंग्राम आता कोरोनाचा संकटात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी होणारे पहिले डिबेट २९ सप्टेंबरला ओहियोमध्ये पार पडेल, अशी माहिती कमिशन ऑफ प्रेसिडेन्शिअल डिबेट्सने दिली आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेट्सचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन रिंगणात आहेत. 

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीचे दोन्ही पक्षांकडून जोरदार बांधणी केली आहे. ट्रम्प यांनी कोरोनाबाबत धाडशी निर्णय घेत आपले महत्व वाढविल्याचे दिसून येत आहेत. त्यातच आता निवडणुकीच्या डिबेटच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. क्लिव्हलँडच्या केस वेस्टर्न विद्यापीठ आणि क्लिव्हलँड क्लिनिक ही डिबेट होस्ट करणार आहे.

पहिली डिबेट २९ सप्टेंबरला हेल्थ एज्युकेशन कॅम्पसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात थेट होईल. दुसरी डिबेट १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबरला होणार आहे. या सर्व डिबेट९० मिनिटांच्या असतील. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या डिबेटमध्ये कोणत्या मुद्द्यांवर भाष्य होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत चीनसोबत अमेरिकेने उघड नाराजी व्यक्त करत त्यांना शिंगावरच घेतले आहे. त्यामुळे या निडणुकीवर याचा काय परिणाम होणार याचीही चर्चा आहे.