ऐकावं ते नवलंच.... आता जिवंत रोबो देणार मुलांना जन्म?

असं काहीतरी करणारा जगातील पहिला रोबो  

Updated: Dec 1, 2021, 06:41 PM IST
ऐकावं ते नवलंच.... आता जिवंत रोबो देणार मुलांना जन्म? title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

सागर आव्हाड, झी 24 तास : जग जसजसं पुढे जात आहे, तसतसं नव्यानं तंत्रज्ञान आपल्या आयुष्याला नवी दिशा देत आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाची पातळी पाहता अशक्य असं काहीच नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हे असं म्हणण्याचं कारण ठरत आहे सध्या जगभरातच चर्चेत असणारी एक बातमी. 

ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामागचं कारणही तसंच आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञांनी बनवलेला जिवंत रोबो आता चक्क प्रजनन देखील करू शकणार आहे. 

आफ्रिकन बेडकांच्या पेशींचा वापर करून वर्मोट युनिवर्सिटी, टफ्ट्स युनिवर्सिटी आणि हार्वर्ड युनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा जगातला पहिला जिवंत आणि स्व:तावर उपचार करणारा रोबो तयार केला आहे. 

2020 साली जेनोबोट्स नावाचा, छोट्या आकाराचा हा रोबो शास्त्रज्ञांनी तयार केला होता. जेनोबोट्स हा बायोलॉजिकल रोबोची सुधारित आवृत्ती आहे.

बेडकाच्या पेशींपासून बनलेला हा रोबो स्वतःचं 'शरीर' तयार करू शकतो. स्वतःवर उपचार करू शकणारा हा रोबो आहे.

एवढंच नव्हे तर तो नव्या जिवंत रोबोला जन्माला देखील घालू शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

आतापर्यंत धातू आणि सिरॅमिकचा वापर करून रोबो तयार केले जात होते. तूर्तास हा रोबो बेडकाच्या पेशींचं शरीर तयार करू शकणार आहे. 

भविष्यात रोबो सिनेमातल्या चिट्टीप्रमाणं हा जेनोबोट्स जिवंत अवतरला, तर आश्चर्य वाटून घ्यायला नको... लक्षात येतंय ना?