अमेरिकेची चीनला तंबी, रशियाला मदत कराल तर....!

US warns China : युक्रेन रशिया युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला जोरदार तंबी दिली. 

Updated: Mar 19, 2022, 07:49 PM IST
अमेरिकेची चीनला तंबी, रशियाला मदत कराल तर....! title=

वॉशिंग्टन : US warns China : युक्रेन रशिया युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला जोरदार तंबी दिली. रशियाला मदत कराल तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जो बायडेन (US president Joe Biden) यांनी शी जिनपिंग यांना दिला. (US warns China of 'consequences' if it helps Russia in Ukraine)

युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी अमेरिकेने केली खरी मात्र बोटावर मोजण्याएवढे देश रशियाच्या पाठीशी उभे राहिलेत. त्यातली महासत्ता म्हणजे चीन. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची फोनवरून 110 मिनिटं मॅरेथॉन चर्चा झाली. यावेळी रशियाला मदत कराल तर गंभीर परिणाम भोगाल, अशी अमेरिकेने चीनला तंबी दिल्यानंतर चीनने अमेरिकेसमोर सारवासारव केली आहे.

कोंडी झालेल्या रशियाच्या पाठीशी चीन उभा राहण्याची भीती आहे. चीन रशियाला आर्थिक आणि लष्करी मदत देण्याची शक्यता आहे. असं केल्यास चीनला त्याचे परिणाम भोगावे लागतील असं अमेरिकेने बजावले. रशियाला मदत केल्यास चीनसाठी ते हिताचे असणार नाही. चीनला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला स्वीकारार्ह नाही. त्यामुळे त्यांना समर्थन देणंही योग्य नाही. या वादावर चर्चेतूनच तोडगा काढला जावा. जगात अशी गंभीर परिस्थिती असताना भविष्यात अमेरिका आणि चीन यांनी एकमेकांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. 

चीन नरमला

अमेरिकेच्या या उघड धमकीनंतर चीननेही नरमाईची भूमिका घेतली आहे. चीनतर्फे या संदर्भात निवेदन जारी करण्यात आले. युक्रेनसारखी स्थिती जगात निर्माण होऊ नये. चीनला शांतता हवी आहे. युद्धाला चीनचा नेहमीच विरोध आहे. शांतता ही चीनच्या इतिहासात आणि संस्कृतीतही आहे. आंतरराष्ट्रीय नियमांशी चीन बांधील आहे. सर्व देशांनी रशिया आणि युक्रेन यांना संवादातून मार्ग काढण्यासाठी मदत करावी, असे चीनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

अमेरिका आणि चीन या दोन्ही महासत्ता आहेत. चीनने रशियाला मदत केली तर या युद्धाला महायुद्धाचं स्वरूप येऊ शकतं. त्यामुळे वाद मिटवून युद्धखोरी टाळणं गरजेचं आहे. मात्र चीनची कपटी वृत्ती पाहता दिलेले आश्वासन चीन कृतीत उतरवणार का याबाबत संशयच आहे.