व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकावर 'चहा'मधून विषप्रयोग? मृत्यूशी झुंज सुरू

रशियामधले विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Updated: Aug 20, 2020, 09:12 PM IST
व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकावर 'चहा'मधून विषप्रयोग? मृत्यूशी झुंज सुरू title=

मॉस्को : रशियामधले विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. एलेक्सी नवाल्नी हे सध्या सायबेरियाच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहेत. एलेक्सी यांच्यावर चहामधून विष देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या प्रवक्त्याकडून करण्यात आला आहे. मॉस्कोला जात असताना एलेक्सी यांची प्रकृती ढासळली, त्यामुळे विमानाचं इमरजन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. यानंतर त्यांना ओमस्कच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

एलेक्सी नवाल्नी यांची ओळख रशियात भ्रष्टाचार विरोधी अभियान चालवणारे नेते आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अशी आहे. एलेक्सी नवाल्नी हे सध्या व्हॅन्टिलेटरवर आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट सुरू आहेत, असं त्यांच्या प्रवक्त्या कीरा यर्मेश ट्विटरवर म्हणाल्या आहेत.

एलेक्सी यांना जाणूनबुजून विष देण्यात आलं आहे, ते सध्या आयसीयूमध्ये आहेत, असं कीरा यर्मेश यांनी मॉस्को रेडिओ स्टेशनला सांगितलं. इमरजन्सी हॉस्पिटल नंबर वनच्या विषप्रयोग झालेल्या रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या आयसीयूमध्ये सध्या एलेक्सी नवाल्नी आहेत, अशी माहिती रशियाची सरकारी न्यूज एजन्सी टीएएसएसनी दिली आहे. 

पोलीस आणि तपास यंत्रणांनी डॉक्टरांची चौकशी केल्याचं यर्मेशनी सांगितलं. एलेक्सी यांच्या चहामध्ये विष मिसळण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, कारण सकाळी त्यांनी फक्त चहाच घेतला होता. एलेक्सी तोमस्कमध्ये काहीतरी कामानिमित्त गेले होते, असं यर्मेश म्हणाल्या.

नवाल्नी यांच्यावर याआधीही शारिरिक हल्ले झाले आहेत. तसंच क्रेमलिनच्या विरोधकांनाही विष देऊन मारल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१७ साली एलेक्सी यांच्यावर हल्ला झाल्याचं यर्मेश म्हणाल्या. एलेक्सी यांच्या ऑफिसबाहेर एका व्यक्तीने त्यांच्यावर हिरवा डाय टाकला होता. केमिकल डोळ्यात गेल्यामुळे एलेक्सी यांचा डोळा जळला होता, असा दावा यर्मेश यांनी केला आहे. 

मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात नवाल्नी यांना आंदोलन केलं म्हणून पोलिसांनी अटक केली होती. अटकेतून बाहेर आल्यानंतर नवाल्नी यांचा चेहरा सुजला होता आणि जखमांच्या खुणाही दिसत होत्या. रशियात सप्टेंबर महिन्यात ३० पेक्षा जास्त ठिकाणी स्थानिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी एलेक्सी नवाल्नी पुतिन यांच्या उमेदवारांविरोधात प्रचार करण्यासाठी दौऱ्यावर गेले होते.