पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाआधी शुभेच्छा देण्यास पुतीन यांचा नकार; जाणून घ्या कारण..

मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, असे पुतीन म्हणाले

Updated: Sep 16, 2022, 10:50 PM IST
 पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाआधी शुभेच्छा देण्यास पुतीन यांचा नकार; जाणून घ्या कारण.. title=

आठ देशांचा सहभाग असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) 22वी परिषद शुक्रवारी पार पडली. या शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी रशियाचे (russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलताना युक्रेनसोबतच्या (ukraine) युद्धाबाबतही भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (pm modi birthday) शनिवारी (17 सप्टेंबर) वाढदिवस आहे. देशभरात भाजपकडून (BJP) मोठ्या उत्साहात पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर वाढदिवासाच्या आधीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (vladimir putin) यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wish) देण्यास नकार दिला आहे. यामागे त्यांनी रशियन परंपरेचा हवाला दिला. 

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक शिखर परिषदेमध्ये मोदी आणि पुतिन यांनी चर्चा केली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान पुतिन म्हणाले की, पंतप्रधान मोदी उद्या तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार आहात आणि मला त्याबद्दल माहिती आहे. 

हसत हसत पुतिन म्हणाले की, "आम्हाला माहित आहे उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही कारण रशियन परंपरा परवानगी देत ​​नाही. मी भारताला मैत्रीपूर्ण शुभेच्छा देतो."

काय आहे रशियाची परंपरा?

रशियामध्ये आगाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे अशुभ मानले जाते. रशियन लोक कोणालाही आगाऊ  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाहीत. तसेच रशियन लोक सहसा त्यांच्या तारखेपूर्वी वाढदिवस साजरा करत नाहीत, कारण ते चुकीचे मानले जाते. जो व्यक्ती आपला वाढदिवस आधी साजरा करतो तो मूळ जन्मतारखेपर्यंत जगू शकत नाही, असा रशियन लोकांचा विश्वास आहे.