Srilanka Crisis : श्रीलंका का झाली दिवाळखोर? देशाची अशी अवस्था होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झालीच कशी? सगळ व्यवस्थीत सुरु असताना आता ही अशी परीस्थिती का?

Updated: Jul 13, 2022, 02:34 PM IST
Srilanka Crisis : श्रीलंका का झाली दिवाळखोर? देशाची अशी अवस्था होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या title=

मुंबई :  श्रीलंकेमधील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालल्याच्या बातम्या समोर येत आहेत. येथे जिवनावशक वस्तु देखील खूप महाग झाल्या आहेत. ज्यामुळे लोकांना ते विकत घेताना देखील अगदी खुप कमी प्रमाणात विकत घ्यावे लागत आहे. एवढेच नाही तर येथे इंधनाची देखील प्रचंड टंचाई आहे. इतकी महागाई आणि राजकीय अस्थैर्य या दुष्टचक्रामध्ये श्रीलंका पुरती मेटाकुटीला आली आहे. देशात महागाईनं उच्चांक गाठला असताना राष्ट्राध्यक्ष गायब झाले आहेत.

सध्याची परिस्थीती काय? 

देशातील जनता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे, तर राजपक्षे 13 जुलै रोजी पद सोडणार आहेत. आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसल्याने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे देश सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत राजपक्षे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थान सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

परंतु प्रश्न असा उभा राहातो की, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झालीच कशी? सगळ व्यवस्थीत सुरु असताना आता ही अशी परीस्थिती का? या मागचं नक्की कारण तरी काय? चला तर आज आम्ही तुम्हाला या मागील असे काही मुद्दे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला श्रीलंकेची अशी अवस्था का झाली हे समजून घ्यायला मदत होईल.

1. परकीय गुंतवणूक कमी झाल्याने महागाई वाढली

श्रीलंकेची अशी अवस्था होण्यामागचं सर्वात मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे परकीय गुंतवणूक कमी होणे. श्रीलंकेतील चलनवाढीचा दर आशियाई देशांमध्ये सर्वाधिक 15% आहे. त्यामुळे देशात महागाई वाढतच चालली आहे. परकीय गुंतवणूक कमी झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे.

यावर मात करण्यासाठी, देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) आशा ठेवल्या आहेत, परंतु त्याचं देखील काहीच झालं नाही. अखेर श्रीलंकेचं आर्थिक कंबरडं मोडलंच.

2.  भौगोलिक परिस्थीती ठप्पं

गेल्या काही दिवसांत देशात पेट्रोलियम गॅसच्या किमती कित्येक पटींनी वाढल्या आहेत. श्रीलंका गेल्या तीस वर्षांपासून तीव्र गृहयुद्धाचा सामना करत आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.

सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात औषधांपासून इंधनापर्यंत दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आयात केल्या जातात.

त्याच्या एकूण आयातीपैकी 20% इंधन आयातीचा वाटा आहे. ज्यामुळे येथील महागाई वाढली.

तसेच देशाचं स्वत:चं असे कोणतंही उत्पन्न नसल्यामुळे खूप गोष्टी आयात कराव्या लागतात. ज्यामध्ये वस्तुच्या किंमती वाढत आहेत.

3. रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली

वर्ल्ड डेटा ऍटलसनुसार, श्रीलंकेच्या एकूण जीडीपीपैकी 12.9% वाटा हा पर्यटन व्यवसायातून येतो. येथे येणाऱ्या पर्यटकांपैकी तीस टक्के हे रशिया, युक्रेन, बेलारूस आणि पोलंडचे आहेत. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे इथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक कमी झाली होती. त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे देखील पर्यटन व्यवसाय ठप्पं झालं. ज्याचा मोठा फटका श्रीलंकेला सहन करावा लागला.

या सगळ्यामुळे श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटली, जी आता ठिक करणं फारंच कठीण होऊन बसलं आहे.