WION Global Summit : 'भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेष संबंध'

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये विशेष स्वरुपाचे संबंध आहेत, असे भारताचे तेथील राजदूत नवदीप सुरी यांनी 'विऑन'च्या जागतिक परिषदेत सांगितले.

Updated: Feb 20, 2019, 02:33 PM IST
WION Global Summit : 'भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये विशेष संबंध' title=

दुबई - भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये विशेष स्वरुपाचे संबंध आहेत, असे भारताचे तेथील राजदूत नवदीप सुरी यांनी 'विऑन'च्या जागतिक परिषदेत सांगितले. दोन्ही देशांमधील व्यापार गेल्यावर्षी ५२ अब्ज डॉलरपर्यंत जाऊन पोहोचला आहे. भारतातून अमेरिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीमध्येच सर्वाधिक निर्यात होते, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.

'झी मीडिया' समूहाच्या 'विऑन' आंतरराष्ट्रीय वाहिनीतर्फे दुबईमध्ये एक दिवसाची जागतिक परिषद बोलावण्यात आली आहे. विविध देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेचे उदघाटन बुधवारी सकाळी संयुक्त अरब अमिरातीचे कॅबिनेट मंत्री शेख नहायन मबारक अल नहायन यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या एका परिसंवादात बोलताना नवदीप सुरी म्हणाले, दुबईमध्ये कार्यालय नाही असा पूर्व आशियामध्ये एकही देश नाही. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३३ लाख भारतीय स्थिरावले आहेत. भारताबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय असणारा एक एकमेव देश आहे. येत्या काही काळात येथे उभारण्यात येणारे हिंदूंसाठीचे मंदिर यातून दोन्ही देशांमधील संबंध किती बळकट आहेत, याचीच प्रचिती येते. संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय कैद्यांची करण्यात आलेली सुटका सुद्धा दोन्ही देशांमधील संबंध घनिष्ठ असल्याचेच द्योतक आहे, असेही नवदीप सुरी यांनी म्हटले आहे. 

दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी बुर्ज खलिफावर प्रकाश दिव्यांच्या साह्याने रेखाटण्यात आलेली महात्मा गांधींची प्रतिमा आणि त्यांचा संदेशही दोन्ही देशांमधील संबंध किती विशेष स्वरुपाचे आहेत, याचीच साक्ष देतात, याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.