धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात, आघाडीत बिघाडी ठरेल निर्णायक

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्व परीक्षा होणार आहे.

प्रशांत परदेशी | Updated: Dec 6, 2019, 12:26 PM IST
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात, आघाडीत बिघाडी ठरेल निर्णायक title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्व परीक्षा होणार आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात या त्रिमूर्ती आघाडीमुळे स्थानिक स्वराज संस्थांची जय पराजयाची गणित बदलून जाणार आहेत. जनतेने या विकास आघाडीला सकारात्मक घेतले कि नाकारात्म हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. खान्देशात या विकास आघाडीला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांचा सामना करायचा आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे अंदाज बांधणे सुरु झाले आहे.   

शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फरपट 
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात शिवसेनेची तर नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या महाविकास आघाडीमुळे फरफट होणार असल्याचे दिसून येत आहे. 

या दोन्ही पक्षांना या जिल्ह्यांमध्ये मजबूत आणि जनाधार असलेले नेतृत्व नाही. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष खंबीर नेतृत्वा अभावी पोरके आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही दिग्गज नेता या दोन्ही जिल्ह्याकडे फिरकला देखील नाही. 

दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त शिंदखेडा मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवली. त्याही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय खेचून आणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा पराभवाची चव चाखायला लावली. शिवसेनेने अक्कलकुवा आणि धुळे शहर विधानसभा निवडणूक लढवली, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतः सभा घेतल्या, मात्र शिवसेनेला सर्व जोर लावूनही या दोन्ही जागांवर यश संपादन करता आले नाही. 

साक्री आणि शिरपूर तालुक्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावालाच शिल्लक आहे. शिवसेनेची ताकद देखील फारशी या तालुक्यांमध्ये नाही. साक्रीच्या नवनिर्वाचित अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला समर्थन दिले आहे, मात्र त्या ज्या नेत्यांच्या जीवांवर निवडणून आल्या आहेत ते नेते काँग्रेस पक्षाचे आहेत. 

शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यात भाजपाला आज अनुकूल स्थिती आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, अक्कलकुवा तालुक्यात नुकतेच शिवसेनावासी झालेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी करिष्मा दाखवू शकतात. 

मात्र नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडी झाली तर रघुवंशी आणि आदिवासी समाजातील नेते यांच्यात कसा मेळ बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नवापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला तोड नाही. अन्य ठिकाणी संमिश्र परिस्थिती राहील असं चित्र आहे.     

आया राम - गया राम 
या दोन्ही जिल्ह्यात विधानसभा निवडणुकी आधी अनेक नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आपली सोया करण्याचा प्रत्यन केला आहे. काहींचा हा प्रत्यन यशस्वी झाला तर काही मात्र फसून गेले आहेत. आया राम - गया रामांच्या पक्षबदलामुळे या दोन्ही जिल्ह्यात मोठी राजकीय स्थित्यांतर झाली आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यात आमदारकी सोडून काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी अक्कलकुवा मतदार संघात शिवसेनेला चांगली मतं मिळवून दिलीत. रघुवंशी याना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. गैरआदिवासी आणि जनाधार असलेले नेतृत्व म्हणून राघवांशींची ओळख जिल्ह्यात आहे. त्याचा फायदा शिवसेनेला येत्या निवडणुकीत होऊ शकतो. 

मात्र आघाडी करायची म्हटल्यास रघुवंशी याना आपल्या जुन्या काँग्रेस पक्षाची जुळवून घ्यावे लागेल. रघुवंशी बद्दल विद्यमान काँग्रेस नेत्यांच्या मनात कटुता दिसून येते. त्यात नंदुरबार जिल्ह्यात ज्या आमदार के सी पाडवींकडे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे त्यांनाच पडण्याचा जोरकस प्रत्यन रघुवंशींनी केला होता. 

काँग्रेस नेते रघुवंशी यांच्या या प्रत्यानाना विसरले तरच जिल्ह्यात आघाडी दिसेल अन्यथा नाही. आघाडी झाली नाही तर मात्र भाजपला याठिकाणी जिकंण्याची चांगली संधी आहे. नवापूर तालुक्यात भरत गावित भाजपात गेल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. 

नंदुरबार तालुक्यात आमदार डॉ विजयकुमार गावित आहेत तर शहादा तालुक्यात आमदार राजेश पाडवी, जयपालसिंग रावल, दीपक पाटील, अभिजित पाटील अशी नेते मंडळी भाजपला चांगले यश संपादन करून देऊ शकते. 

धडगांव, अक्कलकुवा, तळोदा या तालुक्यात आमदार ऍड के सी पाडवी आणि माजी मंत्री ऍड पदमाकर वळवी हे करिष्मा दाखवू शकतात. नवापूर तालुक्यात प्रामुख्याने काँग्रेस आमदार शिरीष नाईक विरुद्ध भाजप नेते भरत गावित सर्मथक असा सामना रंगेल.  

धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी भाजप संघटन मजबूत केले आहे. शिंदखेडा आणि धुळे तालुक्यात तर ते स्वतः लक्ष देत असून, साक्री तालुक्यातील काही भागात त्यांचे वर्चस्व आहे. त्यात आता काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झालेले आमदार काशीराम पावरा, माजी मंत्री अमरीश पटेल, शिवाजी दहिते, पोपटराव सोनावणे ही मंडळी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत प्रभावी ठरेल. 

काँग्रेस मधील अनेक नेते भाजपात आल्याने एका अर्थाने भाजपची ताकद वाढली असली तरी या नेत्यांचे भाजपात येणे जनतेला आवडलेले दिसत नाही. 

अवघ्या चार तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजप गेल्या पाच वर्षात मजबूत झाली आहे. त्याचा फायदा पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो. काँग्रेस पक्षाकडून आमदार कुणाल पाटील एकटे या सर्वाना तोंड देणार आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणाची हि कसोटी ठरणार आहे. 

या निवडणुकीत आमदार पाटील याना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची प्रामाणिक साथ मिळाली तर तेही चमत्कार घडवू शकतात. आमदार पाटील याना धुळे तालुक्यातच अडकवून ठेवण्याची रणनीती भाजप आखेल, असे दिसत आहे. 

भाजप राज्यात सत्तेत बसली असती तर धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील निकाल एकतर्फी राहिले असते. मात्र या महाविकास आघाडीमुळे चुरस निर्माण होईल, हे निश्चित.        

कोण कुठे लढले आणि जिंकले ? 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील आठ जागा आहेत. त्यापैकी नवापूर, अक्कलकुवा आणि धुळे ग्रामीण या तीन ठिकाणी काँग्रेस आमदार आहेत, तर नंदुरबार, शहादा, शिंदखेडा आणि शिरपूर या मतदार संघात भाजप आमदार निवडले आहेत.  

नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडी होणे सर्वाधिक अवघड वाटत आहे. कारण जिल्ह्यात काँग्रेस नेते आमदार ऍड के सी पाडवी याना पराभूत करण्याचे शिवधनुष्य सेनेने उचलले होते. पाडवी याना विजयासाठी शिवसेने विरोधात कडवी झुंज द्यावी लागली. 

अशा परिस्थितीत ज्यांच्या विरोधात दोन महिन्यापूर्वी निवडणूक लढवली त्यांच्याच सोबत आमदार पाडवी जातील का? हा प्रश्न आहे. त्यात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी हे जिल्ह्यातील विद्यमान काँग्रेस नेतृत्वाला रुचत नाहीत, असं दबक्या आवाजात चर्चा आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नंदुरबार जिल्ह्यात फराशी चांगली स्थिती नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना अथवा काँग्रेस सोबत सहज जाईल. 

धुळे जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीला अनुकूल स्थिती आहे. जिल्ह्यातील चार ग्रामीण भागातील जागांवर एकमेकाला पूरक अशी भूमिका काँग्रेस - राष्टवादी आणि शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत घेतली. 

शिंदखेडा मतदार संघात शिवसेनेने शहानाभाऊ सोनावणे यांना भाजप आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात बंडखोरी करायला लावली, ही बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडली. 

धुळे ग्रामीण मतदार संघात शिवसेनेची काँग्रेस आमदार कुणाल पाटील याना छुपी मदत असल्याचे बोलले जाते. साक्री तालुक्यात तर शिवसेना सर्मथक आमदार मंजुळा गावित या काँग्रेस नेत्यांच्या मदतीमुळेच निवडणून आल्या आहेत. 

शिरपूर तालुक्यात मात्र अमरीश पटेल याना फारसा कोणाचा विरोध या तीनही पक्षाकडून झाला नाही. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अधिक आहे तर धुळे जिल्ह्यात आघाडीला अनुकूल स्थिती आहे.   

पक्षविस्ताराला मर्यादा 
महाविकास आघाडीमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पक्षवाढीला सर्वाधिक फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसू शकतो. भाजपाला मात्र या दोन्ही जिल्ह्यात मोकळे रान भेटले आहे. भाजपने या दोन्ही जिल्ह्यात सक्षम नेते आणि कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. 

दोन्ही जिल्ह्यातील सर्व ११२ जागांवर कोणीही वाटेकर नसल्याने भाजप पक्ष वाढीला या निवडणुकीत चालना मिळणार आहे. तर आघाडी झाल्यास काँग्रेस - राष्टवादी काँग्रेस आणि शिवसेनेला जागा वाटून घ्याव्या लागणार आहे. जागा वाटप आले म्हणजे नाराजी आली. त्यामुळे या तिन्ही पक्षांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागू शकतो. 

मात्र आघाडी झाली आणि प्रामाणिक प्रयन्त सर्वानी केले तर भाजपला कडवं आव्हान मिळू शकते. भाजप विरुद्ध सर्व असा सामना होईल अश्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. एकंदरीत आघाडी होण्यावर या दोन्ही जिल्ह्यातील सर्व निकाल अवलंबून आहेत.

भाजपतील अंतर्गत गटांनी हेवेदावे आणि पाडापाडीचे राजकारण न करता निवडणूक लढवली तर भाजप या निवडणुकीत उजवा पक्ष ठरू शकतो. अजून या दोन्ही जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीसाठी एकही बैठक एकत्र घेतलेली नाही. 

अवघे काही दिवस हाती शिल्लक असताना जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. 

एकीकडे शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष सत्ता वाटपाचे नियोजन करत असताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरु केले आहे. 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आघाडीतील प्रमुख लोकप्रतिनिधी मंत्रिपद मिळावं यासाठी कधी मुंबई तर कधी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. त्यात नुकत्याच आलेल्या राज्यातील सत्तेचा लाभ आघाडीचे नेते कसा घेऊ शकतात यावरही बरच काही अवलंबून आहे. प्रामुख्याने या दोन्ही जिल्ह्यात आज तरी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना रंगेल अशी स्थिती आहे.