कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परगण्याच्या तिजोरीच्या चाव्या हातात येतील म्हणून गेली तीन वर्ष धडपडणारा कमळाचा निष्ठावान 'शी'तल त्याच्या महालात उदास होऊन येरझरा मारत होता. शेवटची संधी हुकल्याच त्याच्या लक्षात आलं होतं. तोंडात आलेला घास गेल्याने तो अधिकच हवालदिल होत होता. ज्या दिवशी तिजोरीच्या चाव्या मिळवणार यावर शिक्कामोर्तब होणार होते तो संपूर्ण दिवस त्याला आठवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन राज्य प्रमुख देव"इंद्राने" आपल्याला कसं पुढच्या वर्षात तुलाच तिजोरीची देखरेख करण्याची जबाबदारी मिळेल असे सांगितले होते, ते आठवूनच 'शी'तलच्या दिवसाची सुरुवात झाली होती. पण तरीही चिंचवड परगण्याचे राजे लक्ष्मण अर्थात शंकर यांच्या चंद्ररंग महालातून काही घडेल याची भीती त्याला सतावत होती. म्हणूनच सकाळी उठल्यावर तो शंकराची आराधना करण्यासाठी थेट शंभूच्या मंदिरात गेला आणि नंदीला प्रसन्न करून शंभोची आराधना करू लागला. किमान या शंभोची आराधना केली तर चंद्ररंग मधला शंकर प्रसन्न होईल असा विश्वास त्याला होता.


किती तरी वेळ तो आराधना करत बसला होता, पण दुपारचा प्रहर आला तरी त्याला काही निरोपाचा खलिता मिळाला नाही. शेवटी काही तरी काळेभेरे होतंय हे लक्षात आल्यानंतर 'शी'तलने महापालिकेचे मुख्यालय गाठले. अस्वस्थ होऊन त्याने थेट राजे लक्ष्मण अर्थात शंकराला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. शंकराने विश्वास दिला, मी चंपा आणि देव"इंद्राना" बोलतोय. निरोप पोहचेलच. पण याच घडामोडीत शंकराच्या महालात मागच्या काही महिन्यांपासून नव्यानेच दाखल झालेला थोर अन"मोल" नंदी मुख्यालयात असल्याचे त्याच्या लक्षात आले. दुर्ग'राजू' आणि मोर"ईश्वर' हे त्याच्या साथीला दाखल झाले होते. 'शी'तलने काही ही हालचाल करू नये आणि इतरांनी त्याला साथ देऊ नये यासाठी हे त्रिकुट कामाला लागले होते. त्यांना, काल पर्यंत 'शी'तलला पाठिंबा देणारे ही मदत करत होते. 


या गडबडीत बराच अवधी निघून गेला पुन्हा एकदा 'शी'तलने राजे शंकरला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला तरीही मी बोलतोय एवढेच त्याला यैकायाला मिळाले. तिकडे भोसरीचे राजे महेश अर्थात राम याचा शिलेदार कुलकरण्याचा पर"साद" याने आधल्या दिवशीच मध्यरात्री जाऊन मुंबईहून आणलेला चंपाच्या आदेशाचा खलिता संबंधित व्यक्तीकडे देत त्यांच्या समर्थक "सन"तोषला तिजोरीच्या चाव्या देण्याची व्यवस्था ही करून टाकली आणि पुन्हा एकदा या 'शी'तलच्या तोंडाला पाने पुसली. 
 
तिकडे कोणत्याही घटनेचे प्रसारमाध्यमातून कौतुक करून घेण्यात माहीर असलेल्या राजे राम अर्थात महेश यांच्या पाठिराख्यांची राजे महेश यांनी कसा शब्द पाळला याच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्या. अनेक संकेतस्थळाने राजे महेश यांच्या मुत्सद्दीगिरीचे कौतुक करत ते प्रसिद्ध करत त्यांची जबाबदारी इमाने इतबारे पाळली. 


कमळाचा निष्ठावान असलेल्या 'शी'तलची संधी हुकल्याने आणखी काही निष्ठावान चर्चा करू लागले. 'शी'तल चा बळी जावा म्हणून चंद्ररंग मधला नवा नंदी थोर "अन"मोल आणि त्याचे साथीदार दुर्ग"राजू" तसंच मोर"ईश्वर कसे धडपडत होते यावर चर्चा येऊन थांबली. पूर्वी हेच त्रिकुट राजे लक्ष्मण अर्थात शंकर यांना कशा शिव्या देत होते, याची ही चर्चा या निष्ठावानांमध्ये झाली. तिकीट मिळाले नाही म्हणून नंदी थोर 'अन"मोल ने कसे पैसे खाल्ल्याचे आरोप केले होते. तर दुर्ग"राजू"ने ओल्ड इज गोल्डची हाक देत शंकराला हटवण्याची मोहीम हाती घेतली होती, याचीही  ही आठवण निष्ठावानांना झाली. 


आता हेच त्रिकुट चंद्ररंगवर कसे पाणी भरत आहे याची चर्चा या निष्टावानांनी केली आणि एकाने हे शहरातील नवे "थ्री इडियट्स" असे म्हणताच गंभीर वातावरणातही जोरदार हशा पिकला. तिकडे हे 'थ्री इडियट्स" 'शी'तलचा गेम झाला कसा याची चर्चा एका बंद खोलीत हसत बसले होते आणि पक्षासाठी झटणारी निष्ठावंत कमळे मान टाकून पडली होती...!
(पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे साभार...!)