अमित गडगे,


झी २४ तास, मुंबई


साप... समज-गैरसमज या विषयात मी सापांबद्ल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. साप या प्राण्यासंदर्भात जगभर प्रचंड संशोधन सुरु आहे. आपण त्यात बऱ्यापैकी मागे आहोत. 'साप दिसला की मार' ही वृत्ती अजूनही आपल्यात आहे आणि त्याला कारण आहे सापाबद्दलची भीती, चित्रपट-सिरियल्सच्या माध्यमातून पसरवलेले सापांबद्दलचे गैरसमज... तुमच्या मनातही सापांबद्दल काही शंका असतील तर नक्की विचारा...


सर्पदंश म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्पदंश हा एक अपघात आहे. कोणताही साप आपल्याला जाणुन-बुजून चावत नाही किंवा डूख धरुन हल्ला करत नाही. कारण सापाचा मेंदू तेवढा विकसित नसतो. त्याची स्मरणशक्ती फार कमी असते त्यामुळे त्याला घटना लक्षात रहात नाहीत. 


ज्यावेळी स्वत:ला धोका आहे त्यावेळीच कोणताही साप हल्ला करतो. सर्पदंश झाला की मृत्यू अटळ, असा प्रत्येकाचा समझ असतो पण तो खोटा आहे. कारण साप विषारी आहे की बिनविषारी यावर ते अवलंबून असते. यात आणखीन एक गंमत आहे. बऱ्याचदा विषारी साप चावून देखील एखाद्या व्यक्तीला काहीच होत नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये सर्पविष पचवण्याची क्षमता असावी, असं मुळीच नाही. तर ते सापाच्या चाव्यावर अवलंबून असते. काही वेळा साप चावतो पण तो चाव्यासोबत विष सोडतच नाही. अशा प्रकारच्या सर्पदंशाला कोरडादंश (DRY BYTE) असं म्हटलं जातं. यामुळे व्यक्तीला कोणतीही इजा होत नाही. पण असं फारच क्वचित होतं. 


विषारी सापाच्या तोंडात त्याच्या जाती आणि प्रकारानुसार अनेक लहान दात असतात. या दातांमध्ये दोन विषारी सुळे असतात हे विषदंत पोकळ असतात आणि विषवाहिनीद्वारे विषग्रंथीशी जोडलेले असतात. जेव्हा साप चावतो तेव्हा ते विषदंत मनुष्याच्या शरिरात घुसतात साप जेवढा कडकडून चावतो तेवढा दाब त्याच्या विषग्रंथीवर येतो आणि त्यातून सुळ्यांमध्ये विष प्रवाहीत होते... आणि ते आपल्या शरिरात घुसते.


सापाचं विष हे समोरच्याला मारण्यासाठीच बनवलेलं नसतं. निसर्गानं प्रत्येक प्राण्याला स्वत:च्या संरक्षणासाठी काहीतरी अद्भूत देणगी दिलीय. सर्पविष हा त्यातलाच प्रकार. पण हे सर्पविष केवळ सापाच्या संरक्षणासाठी कामी येत नाही. तर सर्पविष हे सापाच्या पचन संस्थेचाच एक भाग आहे. 


सापाच्या तोंडात भरपूर दात असतात. मात्र या दातांचा वापर तो अन्न चावून खाण्यासाठी कधीच करत नाही. तर साप हा आपलं अन्न पूर्ण गिळून टाकतो... न चावता... त्यामुळे त्याचं पचन सुलभ व्हावं यासाठी त्याला विषाची मदत होते. आपल्या तोंडातील लाळ ज्या प्रमाणे अन्नपचनास मदत करते त्याप्रमाणे सापाचं विष त्याच्या अन्नाच्या पचनास मदत करते. भक्षाच्या शरिरात जेव्हा सापाचं विष दाखल होतं तेव्हा ते त्याच्या शरिरातील सर्व टिश्यू नष्ट करु लागते आणि पचनक्रीया सुलभ होते.