यशवंत साळवे, झी २४ तास, मुंबई : नागराज मंजुळे नाव ऐकलं असेल.हा तो नागराज जो 29 एप्रिल 2016 रोजी रातोरात समाज माध्यमांच्या पटलावर खऱ्या अर्थाने अवतरला असं म्हणता येईल. नागराज हे असं नाव जे रातोरात "सैराट" या चित्रपटाने प्रकाशझोतात आले आणि मराठी सिनेसृष्टीत एक मैलाचा दगड बनून आजही सर्वोच्च शिखरावर विराजमान आहे. ज्याने मराठी चित्रपटही १०० कोटीच्या क्लबमध्ये सामिल होवू शकतो, म्हणजे १०० कोटी रुपयांची कमाई करु शकतो, हे स्वप्न त्याने सत्यात उतरवून दाखवले. सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून मान मिळवला. या चित्रपटाने मराठीतील आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत ११० कोटींच्या पुढे कमाई केली. ही सर्व कमाई एकट्या महाराष्ट्रातून झाली. (वरील फोटो हा  नागराजच्या मासकॉमच्या पहिल्या दिवसाचाच आहे)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी तुम्हाला यापुढे सांगत जाणार आहे, नागराज कसा होता, यासाठी की तुम्ही कुठे आहात याला महत्त्व नाही, तुम्ही तुमचा प्रवास कसा करतात, यासाठी प्रत्येक टप्प्याला कसे सज्ज होतात आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असले तरी हे किस्से तुम्हाला प्रेरणा देतील यासाठी...जाणून घेऊया नागराज मंजुळे विषयी माहित नसलेल्या गोष्टी...


आजही तो दिवस ठळकपणे आठवतो २४ ऑगस्ट २००७ ज्या दिवशी नागराजची इंट्री आमच्या मासकॉम डिपार्टमेंटमध्ये झाली. मासकॉम म्हणजे जेथे पत्रकारीता आणि चित्रपट निर्मितीसारखे विषय शिकवले जातात. 


न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर मधील मासकॉमची आमची पहिली बॅच. यात नागराज एक. सर्वांसाठी हा कोर्स नवीन होता. वेगवेगळ्या राज्यातील बिहार, पश्चिम बंगला,जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू या ठिकाणच्या मुला, मुलींनी कोर्स जॉईन केला होता. 


अहमदनगरमधील आमचे हे पहिले डिपार्टमेंट होते जे सकाळी ७ ते रात्री २ वाजेपर्यंत उघडे असायचे.आमचे पहिले लेक्चर सकाळी सात वाजता सुरू होणार होते. हळूहळू जसा घड्याळीचा काटा पुढे सरकू लागला, तसा मास कॉमच्या लेक्चरचा हॉल हळूहळू भरू लागला. 


सर्व नवीन चेहरे होते..दोन-तीन दिवसात सर्वांची ओळख झाली .नेहमीप्रमाणे सकाळचे पहिले लेक्चर संपल्यानंतर दुसऱ्या लेक्चरची तयारी सुरू झाली आणि HOD मिथुन चौधरी सर यांन डिपारमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत एक उंच सडपातळ, कुरळ्या केसांचा, डोळ्याला चष्मा लावलेला, गव्हाळ रंगाचा मुलगा होता. त्याने अंगात चॉकलेटी कलरचे टी शर्ट आणि जीन्स घातली होती. 


मिथुन सर आल्याने आम्ही सर्व उभे राहिलो आणि  गुड मॉर्निंग सर म्हणालो, तसे सरांनी सर्वांना बसायला सांगितले. तो मुलगा शांत हाताची घडी घालून सरांच्या बाजूला उभा होता. शांत, संयमी थोडासा लाजरा दिसत होता. तो सारखा आपल्या कॉलरला हात लावत होता. चष्मा नीट करत होता. ओठा वरून हात फिरवत होता. आम्हा सर्वांना सरांनी त्याची ओळख करून दिली.


सर म्हणाले... हा नागराज मंजुळे... माझा मित्र...आम्हा दोघांची पुणे  युनिव्हर्सिटीमधील मैत्री. आज आपल्या डिपार्टमेंटमध्ये याचे नवीन ऍडमिशन आहे. नागराजने एम.ए.एमफील केले आहे,आणि बरं का हा छान कविता पण करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नागराजचा वाढदिवस आहे. 


सरांनी येताना मामाला केक आणायला सांगितलेला. नागराजची औपचारिक ओळख करून झाल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये नागराजचा वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी नागराजने मासकॉमला ऍडमिशन घेतले होते. त्यानंतर सरांनी नागराजला वाढदिवसानिमित्त त्याने लिहिलेल्या कवितांपैकी काही कविता म्हणायला लावल्या. त्यावेळेस नागराजने त्याच्या एक- दोन कविता सादर केल्या. 


कोलाहल किंवा उन्हाच्या कटाविरुद्ध अशीच काही तरी कविता होती.नागराजने सादर केलेल्या कविता सर्वांनाच भावल्या. त्यातील अर्थ,त्यातील गंभीरपणा, त्यांनी भोगले दुःख त्या कवितांमधून झळकत होतं. त्या कवितांमधून त्याच्या मनामध्ये चाल्लेला कोलाहल जाणवत होता. तेव्हा वाटतं नागराज हा माणूस कवी आहे, पुढे कवी वैगरे होणार...


त्यावेळेस त्याच्या तोंडून ऐकलेल्या कवितांचा पुढे जाऊन जास्त खपणारा कवितासंग्रह बनेल किंवा हे नाव एवढं मोठं होईल हे वाटले नव्हते. आम्ही सर्वांनी त्यावेळेस नागराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, नागराजने त्या शुभेच्छांचा तेवढ्याच आनंदाने प्रत्येकाशी हस्तांदोलन करून स्वीकार केला.