जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र मागील ५ वर्षापासून दुष्काळात होरपळतोय. पण यात दुष्काळाची गंमत पाहणारे वेगवेगळ्या प्रकारची लोकं दिसून येतात. लांबून दुष्काळात होरपळणाऱ्यांची गंमत पाहणारे आहेतच, काही हळहळ व्यक्त करणारे आहेत, तर काही आपण या गावचेच नाहीत असं पाहणारे. आपण या गावचे नाहीत, असं पाहणाऱ्यांचाही दुष्काळ जीव घेणार आहे. पण सध्या ते प्रतिक्षा यादीत शेवटच्या क्रमांकावर आहेत. मात्र दुष्काळ नावाचा राक्षस बनवण्यात, यादीतले पहिले आणि शेवटचे यांचा वाटा सारखाच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे. ही यादी ग्रामीण भागाकडून सुरू झाली आहे. आता जीव वाचवण्यासाठी, जगण्यासाठी सर्व शहराकडे येतील, तेव्हा हा राक्षस आणखी वेगाने शहराकडे येईल, तेवढ्याच वेगाने शहरी भागातील यादीतले शेवटचे घेरले जातील.


महाराष्ट्रात आमीर खानसारख्या अभिनेत्याची पाणी फाऊंडेशनसारखी सामाजिक संस्था मागील ५ वर्षापासून काम करतेय. आमीरला त्याच्या कार्याबद्दल सलाम. सामाजिक संस्था ग्रामीण महाराष्ट्रात पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी काम करतायत. पण तरी देखील पाण्याची पातळी पाहिजे तेवढी वाढत नाहीय.  दुर्देवाने अशा संस्थांची संख्या देखील फारच कमी वाटतेय, यासाठी आणखी संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.


ग्रामीण महाराष्ट्राच्या छाताड्यावर दुष्काळाचा राक्षस नाचवण्यात ज्या घटकांचा वाटा आहे, ते या कार्यात कुठेच दिसत नाहीत, किंवा दुष्काळाला एवढ्या गंभीरतेने कुणीही घेतलेले नाही. तुलनेने दुसऱ्या विषयांवर सामाजिक संस्था भाऊ गर्दी करताना दिसतायत.


दुष्काळाचा राक्षस बनवण्यात सर्वांचा वाटा कसा हे जरा समजून घ्या. आता शहरात काय तर ग्रामीण भागातही मातीच्या घरात कुणालाच राहायचं नाहीय. घरोघरी सिमेंटचे किचन्स, अशी परिस्थिती झालीय.


निसर्ग आणि हवामानानुसार असलेली रचना आता मोडीत निघालेली आहे. कौलारू छपरांचं तसेच मातीच्या घरात राहण्यात लोकांना लाज वाटते, तर दुसरीकडे सर्वांनाच स्वत:चा फ्लॅट घ्यायचाय, गृह कर्जाचे हफ्ते भरता भरता आयुष्य गेले तरीही.


पण अशी सिमेंटची घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. एका वाळूचा कण तयार होण्यासाठी १० हजार वर्ष लागतात असं म्हणतात. वाळू हे नदीतलं आणि जमिनीतलं पाणी आपल्यात साचवून ठेवते.


मात्र पाणी नदीत थांबवून ठेवण्यासाठी वाळूच नसेल, तर पाणी नदीतंही थांबणार नाही आणि जमिनीत तर अजिबात नाही. तेव्हा महाराष्ट्रात पुढील १० वर्ष वाळू उपसा थांबवला पाहिजे, अथवा वाळूची जिल्हा बंदी केली पाहिजे. वाळू उपसा थांबवल्यानंतर निश्चितच बांधकामाचा प्रश्न उभा राहणार आहे.


बांधकामासाठी लागणारी वाळूची गरज ही धरणात वाहून आलेली वाळू पूर्ण करू शकते, यामुळे धरणांना खोली प्राप्त होईल आणि दुष्काळाचा राक्षस दूर पळवता येणार आहे.


आज मोठ मोठ्या नद्यांच्या पात्रात वाळू दिसेनाशी झाली आहे. वाळूमिश्रित गाळ साचल्याने या नद्यांचं चित्र नाल्यांसारखं झालं आहे, अनेक प्रकारची झुडपं नदीपात्रात उगवतायत, नद्यांचा ऱ्हास होतोय.


नद्यांमधील सर्वात जास्त वाळू उपसा शहरांसाठी होतोय. पाण्याच्या पाईपलाईन देखील शहराला धरणातून जास्त जात आहेत. परिणामी शेती आणि ग्रामीण भाग कोरडा पडतोय. जीव वाचवण्यासाठी सर्व शहराकडे पळतायत. 


पण सर्वच शहराकडे आल्यानंतर, दुष्काळ आणखी वेग घेईल. आणि प्रतिक्षा यादीतल्या शेवटच्यांच काय होईल ते आता सांगावं लागणार नाही.. म्हणून पळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे.