रवी पत्की, क्रिकेट विश्लेषक : अखेर साडेतेरा महिन्यानंतर भारतात कसोटी सामना खेळला जात आहे.भारतातली शेवटची कसोटी नोव्हेम्बर 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध कोलकत्याला झाली होती. त्या नंतर कोविडने थैमान घातले आणि पुढची कसोटी व्हायला साडेतेरा महिने लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या स्टेडियमची खेळपट्टी तपकिरी रंगाची दिसतीये. खेळपट्टीवर गवत असणे अपेक्षित नव्हतेच. जो रूटने टॉस जिंकून बॅटिंग घेणे स्वाभाविक होते. भारतीय संघाला सात आणि आठ नंबरसाठी अश्विन,सुंदर,शार्दुल यासारखे बॉलिंग ऑलरउंडर्स मिळाले आहेत.ही चैन आहे.


विपुलतेचा ही अडचण(प्रॉब्लेम ऑफ प्लेनटी) सुखावह आहे.यामुळे पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि पाच गोलंदाज घेऊन आक्रमक रणनीती आखता येत आहे. आजच्या सामन्यात अश्विन आणि सुंदर दोघांना घेता आले आहे.


अक्षर पटेल तंदुरुस्त नसल्याने नदीमची वर्णी लागली. चेन्नईच्या खेळपट्टीवर पहिले तीन साडे तीन दिवस स्पिनर्स यशस्वी होतील असे वाटत नाही.2016 ला इंग्लंड विरुद्ध भारताने पहिल्या डावात 750 धावा कुटल्या होत्या तर इंग्लंड ने सुद्धा पहिल्या डावात 450 केल्या होत्या. 


फ़ैसला दुसऱ्या डावात झाला होता.आजच्या खेळात थोडा चेंडू कमी जास्त बाऊन्स झाला.ह्या पलीकडे खेळपट्टीने फणा काढल्याचे दिसले नाही.रूट आणि सिबली यांनी छान बॅटिंग केली.


स्पिनच्या दिशेने जास्तीत जास्त खेळण्याचे धोरण इंग्लंडला उपयोगी पडले. अपेक्षेनुसार स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा चांगला उपयोग त्यांनी केला.खेळपट्टीवर अनिश्चितता नसल्याने ह्या फटक्यातून धोका उत्पन्न झाला नाही. जो रूट हा रन मशीन आहेच. 


डोळ्याला अत्यंत आल्हाददायक अशी पाठयपुस्तक बॅटिंग तो करतो.100 व्या कासोटीत शतक करणारा तो 9वा बॅट्समन ठरला.उरलेल्या आठात एकही भारतीय नाही हे बॅटिंगची जागतिक राजधानी असलेल्या आपल्या देशात आश्चर्यच म्हणावं लागेल.


पॉंटिंगने त्याच्या शंभराव्या कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकले होते. इशांत मोठ्या गॅप नंतर गोलनदाजी करतोय हे कळत होतं. ओव्हर मधले सहा चेंडू सहा वेगवेगळ्या वेगात तो टाकत होता.मर्यादित मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर आपल्या इतर गोलनदाजानी ठीकठाक बॉलिंग केली.


दुसऱ्या,तिसऱ्या दिवशी विशेष स्पिन मिळाला नाही तर पहिल्या डावात दोन्ही संघाचा मोठा स्कोर होईल अशी चिन्हे दिसतायत.जो रूटचा दुखावलेला स्नायू त्याला कितपत त्रास देतो त्यावर इंग्लंड करता ह्या कसोटीचेच नाही तर मालिकेचे भवितव्य अवलंबून राहील.