तळपतं ऊन, रस्तावरच जेवण! आरगलया आंदोलनात श्रीलंकेतले सुपरस्टारही... थेट श्रीलंकेतून
श्रीलंकेत सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थी, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी आणि कलाकार असे सगळेच सहभागी झालेत
अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास, कोलंबो : श्रीलंकेतल्या आरगलया आंदोलनात आंदोलकांशी संवाद साधताना वेगवेगळ्या स्तरातली खूप माणसं भेटली. श्रीलंकेला राजपक्षे कुटुंबाच्या जोखडातून मुक्त करा ही मागणी घेऊन विद्यार्थी, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी, धर्मगुरू सगळेच सहभागी झालेत. लोकांच्या मनात असंतोष आहे.
या चळवळीत अशीच एक वल्ली भेटली, तिचं नाव शांती बानुषा. शांती बानुषा हे श्रीलंकन सिनेसृष्टीतलं चर्चेत असणारं नाव. अनेक भारतीय आणि श्रीलंकन सिनेमांमध्ये, टीव्ही सीरियल्समध्ये शांती बानुषाने काम केलंय. शांती बानुषा यांनी या सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. आरगलया हे आंदोलन जवळपास 104 दिवसांपासून सुरू आहे. पूर्ण 104 दिवस शांती या आंदोलनासाठी इथे सेक्रेटॅरिएट बिल्डींगमध्ये सहभागी होत आहे. सर्वसामान्य आंदोलकाप्रमाणेच ती रस्त्यावर जेवते आणि दिवसभर इथे तळपत्या उन्हात ती बसून असते.
शांती बानुषाची सिने कारकिर्द
शांती बानुषाने श्रीलंकन सिनेमांसह भारतीय दाक्षिणात्य सिनेमा आणि टीव्ही सीरियल्समध्येही काम केलंय. शांती बानुषा यांनी तामिळ भाषेत पगल्लीलव या सिनेमात काम केलंय. केरळातल्या मनोरमा या चॅनेलसाठी तिने एका कॉमेडी ड्रामासाठी तब्बल 100 एपिसोड केले. या कॉमेडी ड्रामात ती मेनरोलमध्ये होती.
तिने 8 श्रीलंकन सिनेमांमधून काम केलंय. हे श्रीलंकन सिनेमे सिंहली भाषेत तयार झाले होते. या शिवाय श्रीलंकेतल्या तब्बल 70 सिनेमांमधून तिने काम केलंय. श्रीलंकेत सुपरहिट असलेल्या विश्वगमन, नेत्रांजली या सीरियल्समध्ये तर ती मेन रोलमध्ये होती. मुंबईत एक तामिळ नाटक तयार करण्यात आलं होतं. त्या नाटकाचं नाव दामिनी असं होतं. त्या नाटकात शांती बानुषाने मेन रोल केला होता. मुळात दिग्दर्शक मुंबईकर होते. त्यांनी बसवलेलं हे नाटक तामिळनाडूत चांगलंच चाललं होतं. याशिवाय शांती बानुषा या एक उत्तम नृत्यांगनाही आहेत. वेस्टर्न आणि श्रीलंकन शास्त्रीय नृत्याचा त्यांचा अभ्यास आहे. श्रीलंकन शास्त्रीय नृत्याचे त्यांनी जवळपास 70 हून अधिक स्टेज शोज केलेत. तर वेस्टर्नचे जवळपास 50 हून अधिक शोज केलेत.
कोरोनात श्रीलंकेतील सिनेसृष्टी कोलमडली
कोरोनाने श्रीलंकेतल्या सिनेसृष्टीचं कंबरडं मोडलं. कलाकारांना कोणताही न्याय सरकारने दिला नाही. सिनेसृष्टी पुन्हा उभी करण्यासाठी राजपक्षे सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत अशी खंत ती व्यक्त करते. एकीकडे महागाई कमालीची वाढत आहे. जगणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. पेट्रोल पंपावर रांगा लागत आहेत अशावेळी एक कलाकार म्हणून या चळवळीत उतरण्याचा आपण निर्णय घेतला अशी भूमिका तिने आपल्या पत्रकार परिषदेत मांडलीय.
श्रीलंकेत झी २४ तासची टीम आम्ही पोहोचलो त्याच दिवशी आम्ही शांती बानुषा यांच्याशी संवाद साधला. झी २४ तासच्या प्रेक्षकांनी आणि झी २४ तास युट्यूब चॅनेलच्या प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणावर त्याला पसंती दिली होती. रनिल विक्रमसिंघे अध्यक्षपदी निवडले गेल्यावर संध्याकाळी पुन्हा कोलंबोत जोरदार आंदोलन पेटलंय.
आम्ही सेक्रेटॅरिएट बिल्डींगमध्ये गेलो असता स्वतः शांती बानुषा यांनी आम्हाला ओळखळं आणि आमच्याशी थोडावर प्रांगणात गप्पाही मारल्या. सिनेकलाकारांशी एवढा वेळ गप्पा मारण्याची संधी भारतात तशी मिळतच नाही. त्यामुळेच हा अनोखा अनुभव खास झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी... थेट कोलंबोतून