अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलोमीटर दूर लाईव्ह सेटेलाईटला (एलईओ उपग्रह) ऍन्टी सॅटेलाईटद्वारे (ए-सॅट) पाडलंय. केवळ तीन मिनिटांत हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलंय. 'मिशन शक्ती' असं या कठिण ऑपरेशनचं नामकरण करण्यात आलंय. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ही माहिती दिली. या मोहिमेद्वारे भारतीय वैज्ञानिकांनी मोहिमेचं सर्व उद्देश प्राप्त केले. भारतीयांसाठी हा गौरवास्पद क्षण आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. या क्षेपणास्त्राच्या चाचणीचे महत्त्व खूप आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे 700 किमी उंचीवर असलेल्या उपग्रहांमध्ये जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढण्याची क्षमता असते. याचा दुहेरी वापर केला जातो. नगर विकास, महसूल विभाग, वन विभाग आणि विविध विभाग याचा वापर करतात. लष्करी वापर काय तर शत्रू पक्षाच्या संवेदनशील भागाची छायाचित्र घेता येतात, नौदल तळ - अणू संशोधन केंद्र - क्षेपणास्त्र चाचणी क्षेत्र - लष्करी ठिकाण वगैरे.....


हे उपग्रह सुमारे 90 मिनिटांत पृथ्वीला प्रदक्षिणा करत असतात, म्हणजेच साधारण (+/- ) 7 किमी प्रति सेकंद या प्रचंड वेगाने हे प्रवास करत असतात.


या वेगाने आणि एवढ्या उंचीवरून जाणारे उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे.


यासाठी विशेष रडार यंत्रणा लागते, या वेगाने दिशा बदलत प्रवास उंची गाठणारे क्षेपणास्त्र लागते.



असं तंत्रज्ञान हे स्वदेशी अग्नी क्षेपणास्त्र आणि स्वदेशी क्षेपणास्त्र भेदी क्षेपणास्त्र म्हणजेच PAD ( prithvi air defense ) किंवा AAD ( adavance air defense ) मधून विकसित केले असणार.


ही चाचणी DRDO ने केली आणि इस्रो किंवा आणखी संस्थांच्या सहाय्याने घेतली असणार.


यामुळे प्रत्येक्ष युद्धाच्या वेळी किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताच्या डोक्यावरून जाणारे LEO मधले शत्रू पक्षाचे उपग्रह आपण पाडू शकतो, क्षमता आजच्या चाचणीने भारताने दाखवून दिली.


फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे ही क्षमता आहे. विशेष म्हणजे आपण घेतलेली चाचणी ही 300 किमी उंचीवर होती, म्हणजे यामध्ये उपग्रह नष्ट होतांना जे तुकडे - कचरा निर्माण झाला आहे तो गुरुत्वाकर्षणमुळे वातावरणामध्ये खेचला जाईल आणि नष्ट होईल. म्हणजेच आपल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीचा धोका फार काळ रहाणार नाही.


अर्थात ही चाचणी होती. म्हणजे प्रत्यक्ष क्षमता की किती उंचीपर्यंत उपग्रह पाडण्याची आहे हे यथाअवकाश समोर येईल.


आपल्याकडे ASAT म्हणजेच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रची क्षमता होती मात्र आज वेळ साधली गेली.


जसं भारताकडे अण्वस्त्र असल्याची क्षमता 1960 पासून होती. 1964 चीनच्या अणुस्फोटामुळे भारतानेही चाचणी करावी असा अंतर्गत दबाव होता, मात्र राजकीय परिस्थिती नव्हती. मात्र 1974 ला ते धाडस इंदिरा गांधी यांनी दाखवले.


आता जी ASAT ची चाचणी घेतली आहे ती अभिमानस्पद आहेच. मात्र याला मोदी यांनी ते धाडस केलं असं म्हणता येणार नाही.


अर्थात या चाचणीची साधलेली वेळ यावरून राजकारण होणारच.


अवकाश तंत्रज्ञान, अणू ऊर्जा आयोग किंवा DRDO सारख्या वैद्यनिक संस्था या राजकारणपासून कटाक्षाने दूर ठेवल्या पाहिजेत.


मात्र मोदी यांनी एक घातक पायंडा पाडला आहे असंच या साधलेल्या वेळेवरून म्हणावं लागेल