पोपट पिटेकर,झी मीडिया, कल्याण : प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलाचा वाढदिवस जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा व्हावा. म्हणून प्रत्येक आई-वडील प्रयत्नशील आणि उत्साही असतात. मुलांचा वाढदिवस आई-वडिलांसाठी फार खास असतो. आपल्या मुलाचा वाढदिवस आगदी अविस्मरणीय व्हावा, मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांनी सुद्धा या सोहळ्याच्या आठवणी पाहून खुश व्हावे अशी त्यांची इच्छा असते. त्याला आम्ही देखील अपवाद नाहीत. मात्र कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे 8 सप्टेंबरला शर्विलचा पहिला वाढदिवस आम्ही घरीच अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्विलचा दुसरा वाढदिवस 


बघता बघता शर्विलचा दुसरा वाढदिवस जवळ आला. हा दुसरा वाढदिवस एखाद्या सामाजिक संस्थेत करायचं हे आम्ही ठरवलं होतं. परंतू कुठे? कोणा सोबत ? हे ठरवत असताना कोरोनामुळे लोकांचे झालेले हाल पाहून आम्ही हा वाढदिवस तृतीयपंथींसोबत साजरा करण्याचं ठरवलं. कल्याणमधील तृतीयपंथी गरिमा गृह या तृतीयपंथींयांच्या संस्थेत आम्ही मुलाचा वाढदिवस करण्याचं ठरवलं. याबाबत आम्ही संस्थेसोबत आम्ही इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भारावलेल्या त्यांनी आम्हालाही शर्विलचा वाढदिवस आमच्या संस्थेत साजरा करायला आवडेल असं लगेच सांगून टाकलं.



संस्थेत डेकोरेशनची तयारी


शर्विल पिटेकर याच्या वाढदिवसासाठी गरिमा गृहमध्ये डेकोरेशनकरता मी फुगे, पोस्टर आणि इतर किरकोळ साहित्य घेऊन गेलो. तेव्हा तिथे झोया नावाच्या बहिणीनं आम्ही सर्व करतो म्हणत पुढाकार घेत, डेकोरेशनची जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय आकर्षक अशी सजावटही केली.



हॉलमध्ये शर्विलची एंट्री


ठरल्याप्रमाणे ८ सप्टेंबरला शर्विलची हॉलमध्ये एंट्री होताच सर्व तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवून आणि स्वागत गीत गाऊन आमचं जल्लोषात स्वागत केलं. सर्व जण एक एक करून शर्विलला उचलून घेत होते. त्याची आपुलकीनं विचारपूस करत त्याला प्रेमाने शुभेच्छा देत होते. त्यांच्यातील काही जण हा सर्व सोहळा कॅमे-यात चित्रीत करत होते. 


शर्विलचं औक्षण आणि वाढदिवस


केक कापण्याआधी पाच भगिनी आणि माझी धर्मपत्नी दीपाली यांनी शर्विलचं औक्षण केलं. आपण टिळा लावताना कुंकवाला बोट लावून ते बोट कपाळाला लावतो आणि लगेच बोट बाजूला करतो. मात्र तृतीयपंथीयांची टिळा लावायची पद्धत वेगळी आहे. त्या खूप छान पद्धतीनं कुंकुवाचं बोट शर्विलच्या कपाळावर साधारण 30 ते 40 सेकंद ठेऊन त्या दरम्यान आशीर्वाद देत शर्विलचं औक्षण करत होत्या. त्यानंतर केक कापण्याच्या वेळी त्या सर्वांनी एका सुरात, सुंदर आवाजात 'हॅपी बर्थडे टू यू शर्विल...हॅपी बर्थडे शर्विल...हे गाणं गायलं. सोबतच बार बार दिन ये आए, बार बार ये दिल ये गाए... तुम जियो हजारो साल.. हे गाणंही गायलं. पूर्ण हॉलमध्ये त्यांचा आवाज घुमत होता. केक कापल्यानंतर एका बहिणीने शर्विलला केक भरवला.आणि पुन्हा एक एक करून सर्वांनी शर्विलसोबत फोटो काढले. 



तृतीयपंथी आणि छत्रपती शिवाजी महाराज


केक कापल्यानंतर सर्वांचा एक फोटो घेतल्यानंतर आम्ही पिटेकर परिवारातर्फे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. ती स्वीकारल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाही दिली. तेव्हा अक्षरश: अंगावर शहारे आले. समाजात उपेक्षाच वाट्याला आलेल्या त्यांच्यातली छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा यावेळी ठळकपणे दिसून आली.



तृतीयपंथीच प्रेम


एकंदरीत शर्विलचा वाढदिवस गरिमा गृह संस्थेत साजरा करताना वेगळाच अनुभव आला. कारण आपण तृतीयपंथीयांच्या संस्थेत आहोत, हा विचारच मनात नव्हता. आपलं कुटुंब, आई-वडील, मित्र जसा आपला वाढदिवस साजरा करतात. त्याच आपुलकीने, प्रेमाने, या सर्वांनीही शर्विलसोबत आमच्यावरही प्रेमाचा वर्षाव केला. 


निरोप घेताना


जिव्हाळ्याच्या या कार्यक्रमानंतर हॉलमधून त्यांचा निरोप घ्यायची वेळी आली तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी शर्विला उचलून घेऊन त्याला भरभरून प्रेम आणि दुवा दिली. कोण, कुठल्या पोपट आणि दीपाली पिटेकर यांचा २ वर्षांचा मुलगा शर्विल याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा हिस्सा झाल्याचा त्यांना मनापासून आनंद झाल्याचं त्यांच्या शब्दांसोबतच नजरेतून, देहबोलीतून जाणवत होतं. संस्थेत असंच पुन्हा पुन्हा अधूनमधून येत जात राहा, हा आग्रह आमच्यावरच्या त्यांच्या प्रेमाचीच साक्ष देत होता. तर काही चुकलं असेल तर माफ करा ही त्यांची विनंती आम्हाला भावूक करत होती. त्यांच्या या ओलाव्यानं आम्ही अगदी भारावून गेलो.



आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन 


गरिमा गृहला भेट देण्याआधी तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन जसा असतो तसाच आमचाही होता. कारण कधीच त्यांना जवळून पाहिलं किंवा अनुभवलं नव्हतं. मात्र शर्विलच्या वाढदिवसामुळे त्यांच्याशी जवळीक घडली आणि समाजानं झिडकारल्यामुळे काहीसे उग्र वाटणा-या या किन्नरांमध्येही मायेचा हळवा कोपरा ओतप्रोत भरलेला असतो हे ठळकपणे आम्हाला आणि आमच्या मित्र परिवारालाही दिसून आलं. आपण उगाच त्यांना घाबरतो, किंवा त्यांच्याविषयी नको त्या वाईट गोष्टी ऐकून त्यांच्याबाबत अढी, दुरावा बाळगतो हे त्यादिवशी प्रकर्षानं जाणवलं. 


आपली नजर बदलणं गरजेचं


आजही तृतीयपंथीयांकडे बरेच जण वेगळ्या नजरेनं पाहतात. कारण तृतीयपंथीयांबद्दल ख-या गोष्टी कमी आणि अफवाच जास्त पसरल्या आहेत. त्यामुळेच तृतीयपंथीयांची समाजातली प्रतिमा तितकीशी चांगली नाही. अनेक जण त्यांना पाहताच घाबरुन जातात. मात्र तृतीयपंथी उगाच कोणालाही त्रास देत नाहीत. त्यांच्याबद्दल कायम तिरस्काराची भावना मनात असते. वाळीत टाकल्यासारखं त्यांना सतत वागवलं जातं. समाजातली विकृती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्यक्षात तृतीयपंथीयांबद्दल विकृत दृष्टिकोन बाळगणा-या बुरसटलेल्या समाजाची मानसिकता निकोप होण्याची गरज आहे. कारण तृतीयपंथी यांनाही समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व जपण्याचा, विकासाचा आणि मानानं जगण्याचा हक्क आहे. यासाठी समाजाचंच अभिन्न अंग असलेल्या यांच्यातल्याही संवेदनशील माणसाला जाणून घ्या. तिथे तुम्हाला माणुसकीचाच झरा दिसेल. ज्या प्रमाणे देवळात गेल्या शिवाय देव दिसत नाही, त्याप्रमाणे तृतीयपंथीयांकडे गेल्याशिवाय त्याचं खरं अस्तित्व कळणार नाही.