हार्दीक पंड्या नसल्याने नुकसान होईल- विराट कोहली
पहिला कसोटी सामना अॅडलेड मध्ये होणार आहे.
अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ४ कसोटी सामन्यांच्या सीरीजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होतेय. पहिला कसोटी सामना अॅडलेड मध्ये होणार आहे. यासाठी भारतानं अंतिम-१२ खेळाडूंची निवड केली आहे. अॅडलेडच्या पीचवर खेळण्यासाठी भारतीय बॉलर उत्सुक आहेत, असं वक्तव्य भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने केलं आहे. याचवेळी विराटने ऑलराउंडर हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीबद्दलही भाष्य केलं आहे.
गेल्या काही काळापासून भारतीय बॉलिंगला उत्कृष्ट समजलं जातं आहे. जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या बॉलरनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पण या सीरिजमध्ये भारताला हार्दिक पांड्याच्या ऑलराऊंड कामगिरीशिवायच मैदानात उतरावं लागणार आहे.
पांड्या नसल्याने बॅकफूटवर
पांड्याच्या अनुपस्थितीमुळे इतर खेळाडूंना त्यांची कामगिरी उंचवावी लागणार आहे.. ऑलराउंडर नसल्याने प्रत्येक संघाला त्याचा फटका बसतो. आपल्या टीममध्ये बॉलर-ऑलराउंडर असावा, असं प्रत्येक टीमला वाटतं. आम्ही परिपूर्ण टीमसोबत उतरु शकत नाही. पांड्याच्या अनुपस्थितीत त्याचा भार इतरांना घ्यावा लागेल, असं विराट म्हणाला.
पीचचे आव्हान
ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या जलद उसळी घेणाऱ्या आणि मैदानं मोठी आहेत. भारतीय टीमनं हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवं. आंतरराष्ट्रीय पातळीवर काहीही सोपं नसतं. आपल्या सर्वांना सर्वोत्कृष्ठ कामगिरी करायची आहे. अॅडिलेडची पीच इतर ऑस्ट्रेलियाच्या पीचच्या तुलनेत कमी उसळी घेते, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.
परिस्थिती देणार आव्हान
भारताच्या बॉलर्सकडे अनुभव आणि शैली असल्याचं कोहलीने सांगितलं. पुढे कोहली म्हणाला, गेल्या वेळच्या तुलनेत आता टीम मजबूत आहे. अनुभवी आणि फीट बॉलर्स आहेत. ऑस्ट्रेलियात यशस्वी होण्यासाठी सतत एकाच दिशेने बॉलिंग करावी लागेल, येथीस परिस्थिती प्रतिकूल आहे. कोहली म्हणाला की, आम्ही पूर्ण तयारीने खेळायला उतरु.
बॉलर्स मधील एकी
बॉलर्स स्वत:साठी न खेळता, चांगला स्पेल टाकून संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य कोहलीनं केलं.