कोरोनाचे संकट । परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री - उदय सामंत
कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे.
मुंबई : कोरोना संकटात परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी सारखीच डिग्री मिळणार आहे. त्यात कोणतेही बदल नसल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरोना संकटात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीकडे कोणीही नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये, असे आवाहन सामंत यांनी केले आहे.
कोणत्याही उद्योग किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना भेदाभेद केला, तर महाराष्ट्र सरकार त्या उद्योग व्यवसायावर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला. तर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांतल्या प्रवेश प्रक्रियेबाबत एका आठवड्यात स्पष्टता आणली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जर कोणत्याही एखाद्या उद्योग किंवा कंपनीने कोरोना वर्षात डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी देताना ते कोरोना वर्षातील उत्तीर्ण असल्याने निवडीच्या प्रक्रियेत भेदाभेद केले तर महाराष्ट्र शासन त्या उद्योग व्यवसायावर योग्य कारवाई करेल, असा इशाराही ही सामंत यांनी दिला आहे. त्यामुळे विविध विद्यापीठांनी आखलेल्या नियोजनानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बिनधास्त परीक्षा द्यावी असे सामंत म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील महाविद्यालयात सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेबद्दल एका आठवड्यात स्पष्टता आणली जाईल असे सामंत म्हणाले. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेल्या आणि नंतर लगेच परत घेतलेल्या आदेशाबद्दल ती विभागाची चूक होती. ती लक्षात येताच आदेश परत घेतल्याचं सामंत यांनी सांगितले.
राज्याच्या विविध विद्यापीठांमध्ये अनेक पद रिक्त असून सध्या फक्त कोरोना संकटामुळे नवीन भर्तीवर स्थगिती आणली गेली आहे. मात्र, कोरोना संकटानंतर ती स्थगिती उचलली जाईल आणि विद्यापीठांना आवश्यक मनुष्यबळ पुरविला जाईल अशी माहिती सामंत यांनी दिली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अचूक नियोजन केले असून तब्ब्ल ७ लाख ९२हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे सामंत म्हणाले.