ब्युरो रिपोर्ट :   विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या नीट  (NEET) आणि जेईई मेन (JEE Main) परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे. मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वाची ठरणारी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षा २६ जुलै रोजी होणार आहे. तर आयआयटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वाची असलेली जेजेई (मुख्य) परीक्षा १८ ते २३ जुलै दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना लवकरच रजिस्टर्ड अँडमिट कार्ड देण्यात येणार आहे. त्यात परीक्षा केंद्र, परीक्षा शहर आणि परीक्षा विभागाची माहिती असेल.


नीट परीक्षेसाठी देशभरात १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जेजेई मेन्स परीक्षेसाठी ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा जेईई अँडव्हान्ससाठी पात्रता परीक्षा असते आणि नंतर अँडव्हान्स परीक्षेद्वारे आयआयटी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश दिले जातात. त्यामुळे नीट आणि जेईई या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या परीक्षा आहेत. यावर्षी आयआयटी आणि एनआयटी अभ्यासक्रमांसाठी फीवाढ होणार नाही, अशी माहितीही मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.


सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरवेळापत्रकाची लवकरच घोषणा


सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षेचे पेपर कोरोनामुळे लांबणीवर पडले असून ते कधी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रलंबित विषयांच्या परीक्षेचे फेरवेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होईल असे समजते. दहावी आणि बारावीची परीक्षा उच्च शिक्षणासाठी महत्वाची असल्याने प्रलंबित २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. झालेल्या पेपरची फेरपरीक्षा होणार नाही, ज्या विषयांची परीक्षा राहिली आहे त्याच विषयाचा पेपर द्यावा लागेल, असं मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर स्पष्ट केलं.


 



विविध अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या तयारीसाठी दीक्षा पोर्टल वापरण्याचा सल्ला मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिला आहे.