अभिनेता प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसाद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहेच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकतर या सिनेमाच्या टायटलने आणि त्यानंतर ट्रेलरने सर्वांनाच हादरवून ठेवलं आहे. इतकी सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर यांच्यासारखी मोठी स्टार कास्ट तर आहेच सोबतच या सिनेमात प्रसिद्ध दिग्दर्शक मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही मुख्य कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कथा : 


जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. याआधी या कादंबरीवर ‘नातीगोती’ हे नाटक आलं होतं. यात एका स्पेशल मुलाची आणि त्याच्या आई-वडीलाची कथा आहे. ब-याच सिनेमांमध्ये स्पेशल मुलं कथेचा गाभा असतात, पण या कथेत स्पेशल मुलाचे आई-वडील कथेचा मुळ गाभा आहेत. त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, ते हे सगळं सहन करून कसं जगतात, दु:खात आनंद कसा शोधतात हे सगळं यात फारच संवेदनशीलपणे रेखाटण्यात आली आहे. 


संवाद आणि पटकथा :


चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिली आहे. मुळात हा विषयच इतका नाजूक आहे की, या सिनेमासाठी संवाद आणि पटकथेची सर्वात महत्वाची भूमिका असणार होती. कादंबरीचा सिनेमा करताना त्यात उगाच काही पेरण्यात आलं असतं तर कदाचित विषय तितका प्रभावीपणे पडद्यावर रेखाटला गेला नसता. मात्र चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमासाठी फारच अर्थपूर्ण संवाद आणि तितकीच चांगली पटकथा लिहिली आहे. 


रवी जाधव यांचा अभिनय :


‘बीपी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ सारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा अभिनेता म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. खरंतर या सिनेमातील त्यांची भूमिका सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. इतक्या वेगळ्या सिनेमात तेही मुख्य भूमिकेत रवी जाधव कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र रवी जाधव यांनी पहिलाच सिनेमा असूनही मुरलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय केलाय. या भूमिकेत ते परफेक्ट फिट बसले आहेत. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर सारखे कलाकार समोर असूनही रवी जाधव यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांचं काम पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा बघता येऊ शकतो.


ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट :


‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट शूट करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाचा इम्पॅक्ट अधीक जास्त होतो. असंच सहज हा सिनेमा अशा पद्धतीने शूट करण्यात आलेला नाहीये. त्यामागे एक कारण आहे. मोहन काटदरे(रवी जाधव) आणि शैला काटदरे(सोनाली कुलकर्णी) यांच्या आयुष्यात स्पेशल मुल आल्याने त्यांच्या जीवनातील रंग कसे बेरंग होतात हे दाखवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. कदाचित काहींना हे आवडणार नाही. पण ते कथेशी समरूप आहे. सिनेमटोग्राफर अमलेंदु चौधरी यांनी फारच कमाल पद्धतीने हे सगळं हाताळलं आहे. 


प्रसाद ओक यांचं दिग्दर्शन :


गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला चेहरा म्हणजे प्रसाद ओक. प्रसाद ओक यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. प्रसाद हे गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, सिनेमे आणि मालिकांमधून काम करताहेत. त्यामुळे त्यांना अनुभवही तितकाच जास्त आहे. खरंतर त्यांचा हाच अनुभव इथे त्यांना फायद्याचा ठरला आहे. त्यांचा हा पहिला सिनेमा असेल असं कुठेही जाणवत नाही. एक अतिशय माजूक आणि तितकाच महत्वाचा विषय त्यांनी फारच चांगल्या प्रकारे हाताळला आहे. 


अभिनय :


सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर या कलाकारांनीही या सिनेमात अफलातून अदाकारी केली आहे. यातील कुठलीही भूमिका कमी-जास्त, लहान-मोठी अशी म्हणता येणार नाही. तरीही सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली भूमिका खास लक्षात राहते. सचिन खेडेकर यांनीही नेहमीप्रमाणे आपला ठसा उमट्वला आहे. मनमीत पेम यानेही त्याची भूमिका योग्य साकारली आहे. एकंदर काय तर सर्वांच्याच भूमिका कमाल झाल्या आहेत.