मुंबई : बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. त्याचप्रमाणे जगातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या यादीत देखील ती विराजमान आहे. शिवाय तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगभरात गुगलवर सर्वात जास्तवेळा सर्च करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी प्रियांका ही एकमेव अभिनेत्री आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं झालेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या प्रियांकाने बॉलिवूडच्या खान मंडळींनाच नाही तर महानायक बिग बींना देखील मागे टाकलं आहे. 


ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या सर्वेक्षणात बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'ला २.७२ मिलियन पेक्षा जास्त ऑनलाइन सर्च करण्यात आलं आहे. या यादीत प्रियांका नंतर अभिनेता सलमान खानचं नाव आहे. 


सेमरूशकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने जगातील असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल्याचे सांगितले आहे. या सर्वेक्षणात प्रियांका उच्च स्थानावर आहे. तर सादर करण्यात आलेला हा अहवाल ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ मधील आहे. 


शिवाय, प्रत्येक महिन्यात गुगलवर प्रियांकाला ४.२ मिलियन चाहते सर्च करतात. या सर्वेक्षणात प्रियांकानंतर अभिनेत्री सनी लियोनी आणि दीपिका पादुकोन यांची नावे आहेत. तर भारतीय अभिनेत्यांमध्ये सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. 


सलमाननंतर शाहरूख खान सर्वात जास्तवेळा सर्च करण्यात येणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तर बॉलिवूडचे महानायक या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.