मुंबई : काही प्रसंग किंवा काही घटना किती केलं तरीही त्यांचे परिणाम मागे सोडून जातात. अशाच एका घटनेचे परिणाम त्या घटनेच्यानंतर अनेक वर्षांच्या कालावधीतही कोणी विसरु शकलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्यासाठीसुद्धा अशीच एक घटना धडकी भरवणारी ठरते. ही घटना म्हणजे, 26/11 दहशतवादी हल्ल्याची.  'मुंबई डायरीज 26/11' (Mumbai Diaries 26/11) या वेब सीरिजच्या निमित्तानं मृण्मयीला ते क्षण वेगळ्या दृष्टीकोनातून साकारण्याची संधी मिळाली. पण, आजही तिच्या मनात असणारी 26/11 हल्ल्याची दहशत मात्र कायम आहे. 


त्यावेळी कुठं होती मृण्मयी? 
26/11 अतिरेकी हल्ल्याच्या वेळचे क्षण पुन्हा आठवताना 24taas.com ला दिलेल्या मुलाखतीत मृण्मयीनं तिच्या आठवणी सांगितल्या. 'त्यावेळी मी पुण्यातच होते, एका मालिकेचं चित्रीकरण सुरु झालं होतं. तेव्हाच मुंबईत हल्ला झाला हे कानावर आलं होतं. मुंबई पुण्यापासून फारशी दूर नाही हे ठाऊक होतं. शारीरिक दृष्टीनं आम्ही त्यावेळी मुंबईबाहेर असलो तरीही महाराष्ट्राचा प्राण असणाऱ्या, देशाचा जीव असणाऱ्या मुंबईबाबत चिंता वाटत होती. त्यावेळी नातेवाईकांना, मित्रमंडळींना आम्ही फोन करत होतो, चिंतेनं चौकशी करत होतो. सातत्यानं टीव्हीवर घडामोडी पाहत होतो. ती एक भयंकर रात्र होती, ज्या रात्रीनंतर, त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनंतर साऱ्यांचं आयुष्य बदललं होतं. मुंबईतील परिस्थिती बदलली होती', असं मृण्मयी म्हणाली.  



मुंबईला आपलीशी करा... 
मुंबई म्हणजे सारंकाही, असं म्हणत असताना एक अभिनेत्री आणि या शहरावर प्रेम करणारी एक मुलगी या नात्यानं मृण्मयीनं तिच्या भावना व्यक्त केल्या. एक वाहतूक कोंडी वगळली तर, या शहराची कोणतीही गोष्ट आपल्याला खटकत नाही, असं ती म्हणाली. मुंबईनं जगण्याची प्रेरणा दिली, मानसन्मान दिला, ओळख दिली असं म्हणत तिनं या शहरावरचं प्रेम व्यक्त केलं. 


मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला तिनं एक संदेशही दिला. या शहरात आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेकजण येत असतात. अनेकांच्या करिअरचा संघर्ष या शहरात होतो. या सर्वांनीच मुंबईला आपलंसं म्हणून वागवत या शहराचा आदर केला पाहिजे, शहराच्या स्वच्छतेला गालबोट लागणार नाही, असं वागलं पाहिजे असं म्हणत तिनं सर्वांना मुंबईसाठी एक महत्त्वाचं आवाहनही केलं.