`संतांनी वारी टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती`, दर्ग्यात होणारं नमाज पठण, भजनांचं उदाहरण देत `या` अभिनेत्यानं वेधलं लक्ष
अभिनेता किरण मानेनी संतांनी वारी काही टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती`, असं म्हणत केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
कलाविश्वासोबतच अभिनेता किरण माने राजकराणातही तेवढेच सक्रीय असतो. कधी वादग्रस्त विधान तर कधी तर राजकारण, सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण माने कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या त्याची चर्चा सुरुये ती म्हणजे एका पोस्टमुळं. राज्यभर सध्या आषाढी वारीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, किरणनं केलेल्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 'संतांनी वारी काही टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती', असं म्हणत वारीविषयी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
किरण म्हणतो, ''वारी ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच टाईमपास म्हणून 'वारी' आणि 'किर्तनपरंपरा' सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो.याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा 'हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा' ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची खुपच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पुजतात. मुस्लिम बांधवांकडून आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं''.
पुढे तो म्हणतो, ''विशेष म्हणजे या काळात या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही 'अदा' होत! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन सुरु करतात ! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मजारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लिम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.''
संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी 'मेसेज' द्यायचाय. तो आपण समजून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला 'भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' हा विचार नामदेव, तुकोबारायांपासून आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला. तीच परंपरा आपल्या आज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यंत आणली. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनात आणि मेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर 'आपलंच' डोकं आहे. असं किरण माने यांनी सोशलमीडियावरुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संत तुकोबांपासून सुरु झालेली वारीची ही परंपरा आजतागायत सुरु आहे. कमरेवर हाच ठेऊन उभा असलेल्या या विठ्ठलाचं लोभस रुप अनेकांना मोहित करतं. लहान असो किंवा मोठे, श्रीमंत असो किंवा गरीब आषाढी वारी एकदा तरी करावी असं प्रत्येकालाच वाटतं असतं. गळ्यात तुळशीची माळ आणि हातात कोणतंही शस्त्र नसलेला हा पंढरीचा माय बाप कमरेवर हात ठेऊन युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहतो. या आषाढी वारीचं हे वेड मराठी कलारांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.