Animal Movie Review: बापलेकाची रडवणारी कथा, हिरोची दादागिरी, त्याचा जरब उतरवण्याचा प्रयत्न करणारा खलनायक, नायकाच्या अखंड प्रेमात बुडालेली नायिका अशा तद्दन मसालापटांचा नमुना बॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी काही नवा नाही. हॉलिवूडपटाचे हिंदीकरण करण्याची प्रथा बॉलिवूडमध्ये होऊ पाहताना आता साऊथ इंडियन फील देण्याचाही प्रयत्न करताना बॉलिवूडकर धडपडताना दिसत आहेत. याचा जिवंत नमुना म्हणजे रणबीर कपूर, रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्तपात, जखमा, वेदना, असहाय्यता अशा कैक गोष्टींनी भरलेला हा चित्रपट रूपेरी पडद्यावर सुंदर कथा तयार करतो. नायकाचा काहीसा खलनायकीपणाही यातून दिसतो असा रणबीर कपूरनं साकारलेला अ‍ॅनिमल हा चित्रपट 'अद्भूत' ठरतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये.


तुम्हाला अ‍ॅक्शन मुव्ही आवडत असतील आणि तुम्ही रणबीर कपूरचे चाहते असाल तर नुकताच प्रदर्शित झालेला अ‍ॅनिमल सिनेमा तुम्हाला वेगळी अनुभूती देऊ शकतो. सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटापर्यंत रणबीर कपूरच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील. रणबीर कपूरचा दमदार अभिनय, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि म्युझिकमुळे हा सिनेमा थिएटरमध्ये गर्दी खेचू शकतो.


अ‍ॅनिमल सिनेमा बाप-लेकामधील संवादावर आधार आहे. बलबीर सिंग म्हणजेच अनिल कपूर सिनेमात देशातील सर्वात मोठ्या स्वस्तिक ग्रुपचा मालक आहे. त्याच्याकडे जगातील सर्व सुख संपत्ती आहे. वडील, बायको, 1 मुलगा, दोन मुली, जावई असा परिवारही आहे. मुलगा रणविजयला लहानपणापासून वडिलांबद्दल खूप प्रेम आहे. पण व्यायसायिक जबाबदारीमुळे वडील आणि त्याच्यात कधी संवाद होत नाहीय. वडिलांसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी त्याने लहान वयापासून अनेक गोष्टी सहन केल्या. वडिलांना भेटायला मिळाव म्हणून छोट्या रणविजयने शाळेत मार खाल्ला, वर्ग अर्धवट सोडून पळाला, वडिलांच्या प्रत्येक वाढदिवसाला शाळेत चॉकलेट वाटली. माझे पप्पा जगातील बेस्ट पप्पा असे तो सांगत राहायचा. वडिलांबद्दलच प्रचंड प्रेम असूनही बदल्यात मायेचा हातही फिरवायला वडिलांना वेळ नाही, या सर्वाच रुपांतर हळहूळ अहंकारात होऊ लागत. जे प्रेम, आपुलकी वडिल देऊ शकले नाहीत ते ते सर्व आपल्या बहिणी, बायको, कुटुंबाला देण्याचा प्रयत्न रणविजय करायला जातो. पण लहानपणापासून घडत चाललेली परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता न आलेला रणविजय नाती जपायला गुन्हेगारीची मदत घेत राहतो. 


रणविजयची बायको असलेली गितांजली म्हणजे रश्मिका आणि रणबीरची केमिस्ट्री खूप चांगली जमून आलीय. रणविजयच्या बिंदास्त, अति प्रोटेक्टिव्ह स्वभावाला भाळून स्व:ताचे ठरलेले लग्न मोडून ती खूप वर्षांनी अचानक आयुष्यात आलेल्या रणविजयसोबत लग्नाचा निर्णय घेते. पण त्याचा हाच स्वभाव हळूहळू तिला भीतीदायक वाटू लागतो. दरम्यान रणबीर आणि रश्मिकाचे अनेक रोमॅंटिक सीन्स यामध्ये पाहायला मिळतात. 


मुलाकडे दुर्लक्ष करणारा बाप, कायदा हातात घेतला म्हणून मुलाला कानाखाली मारुन अमेरिकेला पाठवणारा बाप, हल्ला झाल्यावर हतबल होऊन मुलाची आठवण काढणारा बाप अशा वेगवेगळ्या छटेतील भूमिकेत अनिल कपूर आपल्याला दिसतो. 


उपेंद्र लिमयेची छोटी पण लक्षवेधी भूमिका यात आहे. तसेच अजय-अतुल यांच्या 'डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डिजेला' या गाण्याची खास ट्रिट मध्यांतराआधी तुम्हाला मिळेल. संपूर्ण सिनेमात ही 15 ते 20 मिनिटे तुम्ही विसरता येत नाही.


मध्यांतरापर्यंत सिनेमा प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करतो पण त्यानंतरचा बराचवेळ आपापसातल्या नात्यांचा गुंता उलगडण्यात जातो. अचानक अभय देओलची एन्ट्री होते. त्याला रणविजयसारखा दाखवण्यासाठीचे काही सिन्स दिसतात. त्यामध्ये कोण कोणाचा भाऊ, कोण कोणाचा काका हे समजण खूप कठीण होऊन जातं.अ‍ॅक्शन सिन्स दाखवण्यासाठी, सिनेमा पुढे नेण्यासाठी जबरदस्ती भाऊबंदकीची भांडणे त्यात घुसवली जात आहेत का? असेदेखील तुम्हाला वाटू शकते. पण याकडे दुर्लक्ष केलात तर तुम्ही सिनेमा एन्जॉय करु शकता. 


वडिलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा रणविजय सर्वकाही जिंकतो. सर्वावर विजय मिळवतो. पण त्याला वडिलांचं प्रेम मिळत का? सर्वकाही जिंकत असताना मागे काय राहून जात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या सिनेमात मिळतील. हॉलिवूडमध्ये दाखवले जाणारे अ‍ॅक्शन सिन्स या सिनेमाचा यूएसीपी आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणून थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहण्यासारखा आहे. 


सिनेमाचे स्टार: 3.5