`स्टार बनना है तो....`; अट की गरज? जेव्हा तापसीपुढे दिग्दर्शक असं काहीतरी बोलून गेला
तापसीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tappsee Pannu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसीचा 'दोबारा'(Dobara) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी केलं. चित्रपटाची निर्मिती एकता कपूरनं केली. दरम्यान, नुकत्याच मुलाखतीत अनुराग कश्यपच्या एका वक्तव्याचा खुलासा केला आहे की अनुरागनं तिला स्टार बनायचे असेल तर रोहित शेट्टीसोबत काम करं असे सांगितले. अनुराग कश्यपच्या या वक्तव्यानंतर स्टारडम म्हणजेच रोहित शेट्टी असं समीकरण आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. स्टार होण्यासाठी मोठा दिग्दर्शक मिळणं गरजेचं आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांसमोर आहेत.
'मी अनुराग कश्यपला म्हणाले की, 'मला स्टार बनायचं आहे तेव्हा तो माझ्यावर खूप रागावला. तेव्हा 'दोबारा' चित्रपटाचं एडिटिंग सुरु होतं आणि त्यावेळी आमच्या दोघात खूप भांडण झालं. तेव्हा तो मला म्हणाला,'जर तुला स्टार बनायचं आहे तर तू माझ्यासोबत का काम करतेस? जा आणि रोहित शेट्टीसोबत काम कर. पण सगळ्यांचीच काम करण्याची पद्धत एकसारखी नसते,' असे तापसी म्हणाली.
पुढे तापसी म्हणाली, 'मी स्टारडमसाठी एक वेगळ्या वाटेवरनं जाऊ इच्छिते. जर रोहित शेट्टी मला ती संधी देत नाहीत, तर मी काय करू? एक अभिनेत्री म्हणून मी फक्त इच्छा व्यक्त करु शकते. मी एक कलाकार आहे आणि मला स्टार बनायचं आहे.'
पुढे तापसी म्हणाली, 'मी माझ्या क्षमतेनुसार एक कलाकार होण्यासाठी जेवढं करावं लागतं तेवढं सगळं केलं. पण मी दिग्दर्शक नाही, निर्माता नाही. हे एक टीम वर्क आहे. मी अजून स्टार बनले नाही, नाहीतर माझा चित्रपट कसाही असला तरी मी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणू शकले असते.' अनुरागसोबत तापसीचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी तापसीनं अनुराग सोबत 'मनमर्जिया' आणि 'सांड की आंख' चित्रपटात काम केलं आहे.