अनुष्काचे अजून एका नव्या क्षेत्रात पदार्पण...
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास अनुष्का शर्मा यशस्वी ठरली.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास अनुष्का शर्मा यशस्वी ठरली. अभिनयानंतर तिने चित्रपट निर्मितीत देखील आपलं नशीब आजमावलं. मात्र इतक्यावरच ती थांबली नाही. उत्साही अनुष्काने अजून एका क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं आहे. अनुष्काने स्वत:चं ‘नुष’ हे क्लोथिंग ब्रँड लॉन्च केलं आहे. मंगळवारी या ब्रँडचे उद्घाटन झाले.
याबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली, "हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी या ब्रँडसाठी काम करत आहे. कोणतंही नवीन काम करताना ते यशस्वी होईल की नाही याबद्दल दडपण असतं. तसं दडपण, भीती माझ्याही मनात आहे. पण माझी कल्पना मी प्रत्यक्षात उतरवली याचा आनंद देखील आहे."
जी गोष्ट आपल्याला आवडते तीच करा असा संदेश देत ती म्हणाली की, "मला जी गोष्ट आवडते, तेच करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. चित्रपट निर्मितीची मला आवड होती म्हणून क्लिन स्लेट फिल्म्स या माझ्या प्रॉडक्शन कंपनीअंतर्गत निर्मितीचं काम पाहिलं. त्यानंतर पुढे जात मी क्लोथिंग ब्रँडचा विचार केला."
अनेक सेलिब्रिटींचे क्लोथिंग ब्रँड असल्याने लोकांना जास्त विविधता मिळते, असं तिचं मत आहे. त्यामुळे या स्पर्धेचा ती नकारात्मक पद्धतीने विचार करत नाही, असंही तिने सांगितलं.