मुंबई : भारतीय राजकारणात एका वादग्रस्त पर्वात देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर भाष्य करणाऱ्या 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलरमधून भारताच्या राजकारणात गेली कित्येक वर्षे पाय रोवून उभ्या असणाऱ्या इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या आणि गांधी घराण्याच्या अंतर्गत राजकारणावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनीच त्याच्याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही हा ट्रेलर पोस्ट करण्यात आल्यामुळे या साऱ्याला एक वेगळंच राजकीय वळणही मिळालं. याविषयीच आता राजकीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. 


मुख्य म्हणजे हा ट्रेलर पोस्ट करत त्यासोबत देण्यात आलेलं कॅप्शनही सध्या अनेक चर्चांना वाव देत आहे. 'देशावर एक कुटुंब कशा प्रकारे सलग दहा वर्षे राज्य करतं आणि खरा वारस तयार होईपर्यंत डॉ. सिंग हे फक्त नावापुरतेच पंतप्रधानपदावर होते का?', असा प्रश्न उपस्थित करत हा ट्रेलर भाजपने पोस्ट केला.



गांधी कुटुंबावर एका अर्थी थेट टीका करणाऱ्या या ट्रेलरचा भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आल्याविषयी माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही एखाद्या चित्रपटाला शुभेच्छा देऊ शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने बऱ्याच गोष्टींत स्वातंत्र्य घेतलं मग आता त्याच स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्हं का उपस्थित केलं जात आहे असा सवाल त्यांनी केला. 



माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीला अतिशय जवळून पाहणाऱ्या आणि बराच काळ त्याचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू यांच्या एका पुस्तकावर 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर - मेकिंग अँड अनमेकींग ऑफ डॉ. मनमोहन सिंग' या पुस्तकाचा आधार घेत या चित्रपटात अशा काही गोष्टी मांडण्यात आल्या आहेत, जे पाहता पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण येणार ही शक्यता नाकारता येत नाही.