जोधपूर : १९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे.


कलाकारांना झाली होती अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचप्रकरणी 1998 साली सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना अटक करण्यात आली होती. आता या पाचही जणांचा फैसला जोधपूर न्यायालयात होणार आहे.


गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या सगळ्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यानंतर हा खटला सुरू होता आता काळवीट शिकारप्रकरणी हे पाचही जण दोषी ठरणार की निर्दोष सुटणार याचा फैसला गुरुवारी होणार आहे.


वन्य प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचा या पाचही जणांवर आरोप आहे. जोधपूरमधल्या कनकणी गावात दोन काळवीटांची शिकार करण्यात आली होती. २ ऑक्टोबरच्या दिवशी अर्थात जागतिक अहिंसा दिनाच्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या सगळ्यांनी मिळून काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. 


सलमानवर आणखी प्रकरणांमध्येही शिकारीचे आरोप होते, पण त्यामधून तो सहीसलामत सुटलाय, त्यामुळे कनकणी गावातल्या काळवीटांच्या शिकारीचा फैसला सलमानच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. याआधी सलमानला काळवीट आणि चिंकारा प्रकरणी निर्दोष सोडल्याच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका प्रलंबित आहेत.


काळवीटांच्या या शिकार प्रकरणाच्या खटल्यात २९ जणांची साक्ष तपासण्यात आलीय. त्यामध्ये चार डॉक्टर, डीएनए तज्ज्ञ आणि प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिथे वनअधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत शिकार करण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीनं करण्यात आलाय.


एक काळवीट खड्ड्यात पडून मेलं आणि दुसरं कुत्रा चावून मेलं, असाही युक्तिवाद करण्यात आलाय. सलमान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्र आणि नीलम या सगळ्यांनी निर्दोष असल्याचा दावा केलाय आणि निर्दोष सोडण्याची विनंती केलीय. आता न्यायालय  काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलंय.