मुंबई : एकिकडे भारतातील अनेक भागांमध्ये पावसाने दणक्यात हजेरी लावली असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात मात्र दुष्काळाच्या झळाच पाहायला मिळत आहेत. परिस्थितीत असणारी ही तफावत आणि निसर्गाची विविध रुपं जितकी थक्क करणारी आहेत, तितकंच त्या रुपांचे परिणाम हे मन हेलावून टाकणारे आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांतील दुष्काळी परिस्थिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा गावकऱ्यांना करावी लागणारी वणवण आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पाहता आपल्या परिने मदत करण्यासाठी म्हणून बॉलिवूड अभिनेत्याने पुढाकार घेतला आहे. तो अभिनेता आहे, रणदीप हुडा. 


रणदीपने 'खालसा एड' या शीख समुदायातील समाजसेवी संस्थेच्या सहाय्याने नाशिकनजीक असणाऱ्या वेले नामक एका खेडेगावात जात दुष्काळग्रस्त गावात पाणी पोहोचवण्यास सहकार्य केलं आहे. त्याने सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओही पोस्ट केला. 


रणदीपने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याच्या मागे गावकरी पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. शहरी जीवनात सुखसोईंचा उपभोग घेत असताना या खेड्यातील भीषण वास्तवच त्याने सर्वांसमोर ठेवत परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. शिवाय सरकारने या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे, असा आग्रही सूरही त्याने या व्हिडिओत लगावला आहे. त्यामुळे आता रणदीपची हाक तरी शासनदरबारी पोहोचते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 



अनेक धरणं बांधण्यात आली असतानाही या गावकऱ्यांना मात्र त्याचा काही फायदा होत नाही, मुळात तिथपर्यंत या सोयी पोहोचतच नाहीत, ही वस्तुस्थितीही त्याने मांडली. कलाविश्वातील व्यग्र वेळापत्रकातूनही वेळ काढत आपलं सामाजिक भान जपणाऱ्या रणदीपची चाहत्यांनी प्रशंसा केली आहे. फक्त रणदीपच नव्हे, तर कलाविश्वातल अनेक सेलिब्रिटी दुष्काळग्रस्तांसलाठी विविध मार्गांनी मदत करत आहेत. त्यामुळे समाजभान जपण्यात ते मागे नाहीत हेच खरं.