मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मुळात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच देशात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. याचा परिणाम थेट देशवासियांच्या दैनंदिन जीवनावर झाला. हातावर पोट असणाऱ्या स्थलांरित मजुरांच्या वर्गाला यादरम्यान अधिक अडचणींचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडचणीत अडकलेल्या याच मजुरांच्या मदतीला धावून आला तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद. सोनूनं स्वखर्चानं आणि सर्व आवश्यक त्या परवानग्या, परवाने मिळवत या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या समाजकार्याने अनेकजण भारावले. कित्येकांनी या अभनेत्याला शुभाशिर्वादही दिले. पण, त्याच्या या कार्याला गालबोट लावणारी काही मंडळीसुद्धा या प्रकरणी संतापजनक काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


खुद्द सोनूनंच केलेलं ट्विट पाहता ही बाब स्पष्ट होत आहे. सोनू सूदच्या नावे काही स्थलांतरीत मजुरांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे. हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर या अभिनेत्याने सर्व मजुरांना सावधगिरीचा इशारा दिला. 


'मित्रांनो, श्रमिकांसाठी आम्ही जी सेवा पुरवत आहोत ती अगदी विनामुल्य आहे. माझं नाव सांगून तुमच्याकडून कोणीही पैसे आकारत असेल तर, त्याला नकार देत तातडीनं आम्हाला किंवा कोणत्याही नजीकच्या पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा पोलीस कर्मचाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करा' असं ट्विट त्यानं केलं. 



 


कित्येक दिवसांपासून देशाच्या राजकीय पटलावर स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीवरुन राजकारण तापत असतानाच दुसरीकडे सोनू सूद मात्र आपल्याच अंदाजात या श्रमिकांच्या मदतीसाठी पुढे आला.