मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्वत्र फ्रेंडशिप डे, अर्थात मैत्रीच्या नात्याचा आनंद साजरा करण्याला साऱ्या जगाने प्राधान्य दिलं. कुठे मित्रांसमवेत वेळ व्यतीत करत, तर कुठे त्याच मित्रांसोबतच्या आठवणींमध्ये रममाण होत हा दिवस साजरा केला गेला. यामध्ये कलाविश्वही मागे राहिलं नाही. 'फ्रेंडशिप डे'च्या याच दिवसाचं औचित्य साधत 'छिछोरे' या बॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटणारे मित्र हे एक व्यक्ती म्हणूनही आपल्याला कायमच घडवत असतात. अशाच काही अतरंगी आणि हवाहव्याशा मित्रांचं सुरेख नातं 'छिछोरे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून याची सुरेख झलकही पाहायला मिळत आहे. 


सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसिन यांच्या भूमिका असणाऱ्या छिछोरे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा डोकावण्याची संधी मिळणार आहे. तर, मैत्रीचं हे नातं म्हणजे फक्त धमाल, मजा मस्तीतच एकत्र असणं नव्हे, तर उतारवयातही एकमेकांचा आधार होत एकत्रपणाची भावना तशीच कायम असणं... हा सुरेख संदेश या ट्रेलरच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे मैत्रीचा तरुणाईपासूनचा उतारवयापर्यंतचा हा प्रवास आता प्रेक्षकांना भावतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



नवीन पॉलीशेट्टी, तुषार पांडे, प्रतिक बब्बर, साहर्ष कुमार शुक्ला या कलाकारांचाही सहभाग असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी 'फॉक्स स्टार स्टुडिओज'च्या साथीने केली आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.