लो नेकलाईन ड्रेसवर आईची प्रतिक्रिया ऐकून म्हणाल.....
या ड्रेसमुळे अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली.
मुंबई : अभिनेत्री priyanka chopra प्रियांका चोप्रा हिने कायमच जागतिक स्तरावर तिची वेगळी छाप सोडत या कलाविश्वातील तिचं स्थान आणखी भक्कम केलं आहे. सामाजिक पातळीवर काम करणारी, निर्मिती संस्थेची जबाबदारी घेणारी एक अभिनेत्री, मुलगी आणि पत्नी अशा बऱ्याच भूमिका ही देसी गर्ल अगदी लिलया पेलते. पण, प्रत्येक वेळी प्रियांकाचे निर्णय आणि तिच्या भूमिका चाहत्याना पटतीलच असं नाही.
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या वेळी याचा प्रत्यय आला. प्रियांकाने या अतिशय दिमाखदार सोहळ्यासाठी लो नेकलाईन ड्रेसला पसंती दिली होती. पांढऱ्या आणि सोनेरी रंगांची रंगसंगती असणआऱ्या या ड्रेसमुळे अनेकांनीच तिच्यावर टीकेची झोड उठवली.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
अंगप्रदर्शनाचं नाव देत तिला काहींनी निशाण्यावर घेतलं. पण, या सर्व मंडळींना आता थेट प्रियांकाच्या आईने म्हणजे मधू चोप्रा यांनीच उत्तर दिलं आहे. प्रियांकाची खिल्ली उडवली जाण्याविषयी आपलं मत मांडत त्या म्हणाल्या, 'माझ्या मते जे झालं ते योग्यच झालं. कारण, त्यामुळे प्रियांका आणखी खंबीर झाली. जोपर्यंत आपल्यामुळे इतरांना त्रास होत नाही तोवर ती तिच्या स्वत:च्याच तत्वांवर आयुष्य जगत आहे. हे तिचं शरीर आहे आणि ते तितकंच सुंदर आहे.'
प्रियांकाने Ralph and Russo डिझायनर ड्रेस घालण्यापूर्वी तो आपल्याला दाखवला होता, असंही त्यांनी सांगितलं. 'तो ड्रेस कार्यक्रमाला वापरण्याआधी तिने मला दाखवला होता. हे जरा धोका पत्करण्यासारखंच असल्याचं मला वाटलं होतं. पण, त्या कार्यक्रमात ती सर्वात सुंदर वेषभूषेत गेलेल्या कलाकारांपैकी एक होती', असं म्हणत तिची खिल्ली उडवणारे हे संगणकांच्या मागे बसलेले आहेत या शब्दांत ट्रोलर्सवर निशाणा साधला. त्यांच्या जीवनात करण्यासाठी कोणत्याच गोष्टी नसल्यामुळे आता ते इतरांचं लक्ष वेधण्यासाठी असं काहीतरही करत आहेत, असं मधू चोप्रा म्हणाल्या. मी त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही, या शब्दांत त्यांनी खिल्ली उडवणाऱ्यांवर निशाणा साधत प्रियांकाच्या लूकचं समर्थन केलं.