मुंबई : हॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या #MeToo या चळवळीला भारतातही सध्या चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने जवळपास दहा वर्षांपूर्वी आपल्यासोबत घडलेल्या एका वाईट प्रसंगाविषयी वाच्यता करत या चळवळीला हिंदी कलाविश्वात सुरुवात केली. ज्यानंतर अनेक महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वातील अभिनेत्रीही यात मागे राहिल्या नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषण आणि अत्याचारांविरोधात चर्चा होत असतानाच एकिकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा यांनी आपल्या ठाम भूमिका मांडल्या आहेत तिथेच एक काळ गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 


पत्रकार राजीव मसंद यांच्या 'एक्ट्रेसेस राऊंड टेबल' या चर्चासत्रामध्ये राणी सहभागी झाली होती. यावेळी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, तब्बू, तापसी पन्नू आणि अनुष्का शर्मा यांचाही समावेश होता. याच कार्यक्रमात अभिनेत्रींनी #MeToo विषयी त्यांची मतं विचारण्यात आली. त्यावेळी सध्याच्या घडीला कुठेतरी भीती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे, असं म्हणत घरानंतर कामाच्याच ठिकाणी तुम्हाला सुरक्षितच वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. पण, तिथे जर सुरक्षिततेचं वातावरण नसेल तर मात्र ही बाब अत्यंत चिंताजनक आहे असं अनुष्का शर्मा म्हणाली. 


राणीनेही या मुद्द्यावर आपले विचार मांडले, पण तिचे विचार ऐकताच अनेकांच्याच भुवया उंचावल्या.  'एक महिला म्हणून आपण इतकं जास्त ताकदवान असलं पाहिजे की जर असा कोणताच प्रसंग उदभवला तर त्याचा आपल्याला विरोध करता आला पाहिजे. आत्मसंरक्षण करता येण्याइतकं बळ महिलांमध्ये असलं पाहिजे', असं ती म्हणाली. 






'आईनेच आपल्या मुलाला कसं मोठं करावं हे तुम्ही सांगणार नाही', असं म्हणत राणीने पुन्हा आपला विचार मांडला. सोशल मीडियावर राणीच्या या विचारांनी अनेकांच्याच भुवया उंचावल्या. काहींनी तिच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली. तर काहींनी ती अगदी यशराज फिल्म्समधील अभिनेत्री शोभतेय अशा कमेंट केल्या. राणीची ही मतं अनेकांना पटण्यापलीकडली असल्यामुळे आता तिचा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विरोध केला जात आहे.