Movie Review : गुंतलेल्या प्रेमात गोंधळलेला `लव्ह आज कल`
नेमकं चाललंय तरी काय...
मुंबई :
दिग्दर्शक- इम्तियाच अली
कलाकार- कार्तिक आर्यन, सारा अली खान, रणदीप हुड्डा, आरुषी शर्मा
'लव्ह आज कल' या चित्रपटाच्या नावावरुन आणि त्याच्या ट्रेलरवरुन प्रेक्षकांना या चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज आलाच होता. सध्याच्या पिढीमध्ये प्रेम, नातेसंबंध, रिलेशनशिप या साऱ्या मुद्द्यांवर एक प्रकारचा गोंधळ पाहायला मिळतो. ज्याला मग विविध नावं दिली जातात. हाच गोंधळ अमुक एका व्यक्तीच्या मनावर क्षणाक्षणाला थेट परिणाम करत असतो. हेच चित्र इम्तियाच अली याने आपल्या दिग्दर्शनात साकारलेल्या लव्ह आज कल या चित्रपटाने मांडण्याचा प्रयत्न केला.
११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्याच चित्रपटाच्या नावाने त्याने सारा आणि कार्तिकच्या रुपात एक नवी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली. पण, भावनांची ही गुंतागुंत मांडताना इम्तियाचा हा चित्रपट मात्र काहीसा प्रमाणापेक्षा जास्तच गुरफटला गेला, असं दिसत आहे.
करिअरला प्राधान्य देणारी, मनमुराद आयुष्य जगणारी आणि वर्तमानात जगणारी मुलगी साकारताना सारा प्रेक्षकांना भावते. नातं, प्रेम, रिलेशनशिप याकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या याच साराला जेव्हा वीर भेटतो तेव्हा मात्र ती त्याच्यावर भाळते. वीरचं जोए (सारा)प्रती वागणं तिला काहीसं खटकतं. चित्रपटात साराच्या बॉसच्या भूमिकेत असणारा रणदीप हुडा तिला प्रेमाच्या भावनेचा खरा दृष्टीकोन देतो. रणदीपच्या तारुण्यावस्थेतील हीच प्रेमकथा म्हणजे या चित्रपटातील ९०च्या दशकातील एक सुरेख नातं. याच नात्याविषयी ऐकल्यानंतर जोएला (सारा) वीरच्या प्रेमाचं महत्त्वं कळत आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडते.
प्रेमात सारंकाही आलबेल असेल तर मग ते प्रेम कसलं? असंच एक वळण या चित्रपटात येतं. करिअर आणि नात्यांमध्ये गोंधळलेल्या वीर आणि जोएचं नातंही अशाच वळणावर येतं. तिथे ९०च्या दशकातील प्रेमकहाणीनेही असंच वळण घेतलेलं असतं. सहसा प्रेम, गोंधळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वस्तूस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात इम्तियाज अलीचा हातखंड आहे. पण, यावेळी मात्र इथेच इम्तियाज चुकला आहे.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
दोन प्रेमकहाण्यांचा घटनाक्रम इतक्या वेगाने पुढे जातो की, नेमकं काय सुरु आहे याचा अंदाजच येत नाही. प्रमाणाबाहेरची भावनिक दृश्य चित्रपटात असल्यामुळे एका क्षणाला प्रेक्षकांना ती कंटाळवाणी वाटू लागतील. पटकथा फारशी तगडी नसली तरीही चित्रपटाच्या संगीताने ही विस्करटलेली घडी नीट लावण्यात हातभार लावला आहे.
सारा आणि कार्तिकचा अभिनयही कुठे कमी पडत नाही. पण, मुळात कथाच भरकटल्यामुळे सारंकाही गोंधळल्याचंच पूर्वार्धापर्यंत लक्षात येतं. साराच्या तुलनेत आरुषी शर्मा या चित्रपटाच तिची वेगली छाप सोडून जात आहे. तर, रणदीप हुड्डाला चित्रपटात पुरेपूर वापरून न घेता इम्तियाज अली थोडक्याच चूक केली की काय असाच प्रश्न पडतो.