लोकप्रिय गायकाच्या घरी नव्या सदस्याची एंट्री
आनंदाची बातमी म्हणजे...
मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींविषयी फॉलोअर्सना आणि चाहत्यांना माहिती देण्याकडे अनेक सेलिब्रिटींचा कल असतो. या सेलिब्रिटींपैकीच एक असणाऱ्या एका गायकाच्या घरी सध्या आनंदाची उधळण झाली आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
ही आनंदाची बातमी म्हणजे त्याच्या कुटुंबात झालेल्या एका नव्या एंट्रीची. हा सेलिब्रिटी म्हणजे पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम. बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या या गायकाने त्याच्या कुटुंबातील या नव्या सदस्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत , 'न्यू अरायव्हल' असं लिहित त्याने बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं.
आतिफने ही आनंदाची बातमी देताच चाहत्यांनी त्याला आणि त्याची पत्नी सारा भरवाना हिला शुभेच्छा देत त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. बाळाचं नाव किंवा इतर कोणतीही माहिती त्याने अद्यापही दिलेली नाही. त्यामुळे आता चाहत्यांना याबाबतचीही उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, आतिफ आणि साराला यापूर्वी एक मुलगा आहे. आहाद आतिफ असं त्याचं नाव. आहादच्या मागोमाग आता या नव्या सदस्याची नेमकी ओळख काय असणार याचीच विचारणा आतिफ आणि त्याच्या पत्नीकडे होऊ लागली आहे.
....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं
पाकिस्तानी गायक म्हणून आतिफ अस्लम कलाविश्वात ओळखला जात असला तरीही भारतातही त्याची लोकप्रियता कमी नाही. दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणाची पार्श्वभूमी पाहता पाकिस्तानी कलाकारांच्या हिंदी कलावर्तुळातील वावरावर काही निर्बंध आले. पण, त्यातही हे निर्बंध येण्यापूर्वी काही कलाकार मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. त्यातील एक नाव आतिफ अस्लम.