....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं

एक आवाज झाला.... जणू काही.... 

Updated: Dec 25, 2019, 09:40 AM IST
....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं title=
tanhaji the unsung warrior

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कामगिरीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे अजय देवगनची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये शिवबांचे मावळे, सुभेदार हेच चित्रपटाचं कथानक पुढे नेणारे ठरतील. अशा या अतिशय महत्त्वाकांक्षी चित्रपटामध्ये 'जय मल्हार' या मालिकतेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागेसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा भाऊ, सुर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत तो दिसणार आहे. 

देवदत्तची या चित्रपटातील भूमिका ही जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती आव्हानात्मकही होती. या चित्रपटासाठी त्याने खऱ्या अर्थाने मेहनत घेतली असून, अक्षरश: अश्रूही ढाळले. अजय देवगनसोबतचा हा चित्रपट देवदत्तच्या कारकिर्दीलाही खऱ्या अर्थाने कलाटणी देणारा, त्याला काही आव्हानं देणारा ठरला आहे. याविषयी खुद्द देवदत्तनेच 'झी २४तास'शी संवाद साधताना माहिती दिली. 

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, बऱ्याच साहसदृश्यांचा भरणा असल्याचंही ट्रेलर पाहता लक्षात येत आहे. केबलच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या थरारक दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान, एका दृश्याच्या वेळी देवदत्त एका अपघाताला सामोरं गेला. 

'तो स्टंट करताना माझ्या पायाला फार मोठी दुखापत झाली होती, एक स्नायू अतिशय ताणला गेल्यामुळे पाय खालीच अडकला होता आणि मला वर खेचलं गेलं होतं. याच बहुधा माझी चूक असावी किंवा मी त्या दृश्यासाठी तयार नव्हतो. त्यावेळी चित्रीकरणादरम्यानच एक आवाज झाला, जणू कोणी पायावर काठी मारली. हा आवाज क्रिसी नावाच्या हॉलिवूडच्या एका स्टंटमॅननेही ऐकला, जो त्यावेळी सेटवर उपस्थित होता', असं देवदत्त म्हणाला. 

अपघाताविषयी पुढे सांगत तो म्हणाला, 'मी उभा राहताच कोसळलो. कारण, माझ्यात काही संवेदनाच उरल्या नव्हत्या. मी चालण्यास सुरुवात केली, तेव्हा पाय खालीही टेकवत नव्हता. पाय लटका पडला होता. मला तातडीने उचलून एका बाजूला ठेवण्यात आलं. लगेचच माझ्यावर उपचारही सुरु झाले. पण, मी उभाच राहू शकत नव्हतो. मला त्या क्षणी अश्रू अनावर झाले, रडू कोसळलं'. शूर मावळा साकारणाऱ्या देवदत्तचं असं रडणं त्यावेळी ज्यांनी पाहिलं, त्यांचंही मन हेलावलं. 

आपल्यामुळे सबंध चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्यांना त्रास होऊ नये याच भावनेने त्याने ओम राऊतकडे चित्रीकरणासाठीची ओढ व्यक्त केली. देवदत्तची चित्रपटाविषयीची आत्मियता पाहून, दिग्दर्शक ओम राऊतही भावूक झाला. अनेक प्रयत्नांनंतर आणि एका दिवसाच्या थोडक्या आरामानंतर देवदत्त नागे पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी उभा राहिला होता. आपल्याला होणाऱ्या वेदना दिग्दर्शकाला दिसल्या तर ते त्याच्याही चेहऱ्यावर दिसणार, या एकाच भावनेने देवदत्तने त्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्याची ही वृत्ती पाहून चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शनाचं काम पाहणाऱ्यांनीही त्याचं कौतुक करत आपल्याला त्याचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. Pain is temporary, but shot is permanent, असं म्हणत आर्नॉल्डच्या याच वाक्याचा आधार त्यावेळी देवदत्तला मिळाला. 

काजोल आणि अजय देवगन म्हणजे दादा- वहिनी 

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान, शरद केळकर यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगताना फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर सेटवर असताना खऱ्या आयुष्यातही काजोल आणि अजय देवगन यांची जोडी म्हणजे आपल्याला जणू दादा- वहिनीसारखीच असल्याचं सुरेख वक्तव्य देवदत्तने केलं. सेटवर काजोलसोबत अस्खलित मराठीत संवाद साधण्यापासून अजय देवगनच्या लोकप्रियतेचा नेमका अंदाज त्यावेळी त्याला सेटवर आला. या चित्रपटाच्या निमित्ताने बी- टाऊनच्या या सेलिब्रिटी जोडीशी त्याचं खास नातं जोडलं गेलं. 

सैफ अली खान याची कलेप्रतीची ओढ आणि समर्पकता देवदत्तला भारावून गेली. पहिल्या- दुसऱ्या शॉटमध्येच दृश्यासाठी लागणाऱ्या गोष्टींप्रमाणे अभिनय करुनही तो असंख्य टेक देण्यासाठीही तयार असायचा हा त्याचा गुण आणि उत्साह देवदत्तच्या मनात घर करुन गेला. 

'शरद केळकर, जेव्हा राजांच्या रुपात आला तेव्हा मल्हार.... म्हणत त्याने मला मिठी मारली तेव्हा खुद्द राजेच समोर उभे असल्याची अनुभूती मला झाली', असं देवदत्त म्हणाला. त्यावेळी आपोआपच त्याला आदरार्थी संबोधावसं वाटलं, असं म्हणत महाराजांप्रतीचं त्याचं प्रेम या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त झालं. 

कलाकारांशी तयार झालेलं नातं असो किंवा मग भूमिकेप्रती, आपल्या वाट्याला आलेल्या पात्राप्रतीची आपुलकी आणि प्रेम असतो, देवदत्त नागे यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी ही ताकदीने पेलली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.