#WelcomeHomeAbhinandan : बॉलिवूडमध्येही उत्साह
भारताचे विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत.
मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीरमधील पुलवामात आत्मघाती हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. भारताकडून २६ फेब्रुवारी रोजी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत सर्जिकल एअर स्ट्राईक करण्यात आला. या एयर स्ट्राईकचे संपूर्ण भारतभर जल्लोषात स्वागत केले जात असताना भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पोहचल्याची बातमी आली. संपूर्ण भारतातून अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी करण्यात येत होती. अखेर पाकिस्तानकडून अभिनंदन यांना सुखरूप सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात आली. या बातमीने सर्व भारतीयांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अभिनंदन यांच्या सुटकेच्या घोषणेने बॉलिवूड कलाकारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या या घोषणेचे बॉलिवूडमधूनही स्वागत करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन यांच्या स्वागताचे ट्विट केले आहे.
अभिनंदन यांच्या पाकिस्तानमधील सुटकेनंतर ते वाघा बॉर्डरद्वारे भारतात परतणार आहेत. वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांची सुटका होण्याची शक्यता आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी नागरिक अटारी-वाघा बॉर्डरवर तिरंगा घेऊन पोहोचत आहेत.