मुंबई : नृत्य हे एक असे माध्यम आहे, ज्यामार्फत तुम्ही आपली भावना, कर्तुत्व, विचार लोकांपर्यंत पोचवू शकता. नेमका याचाच आधार घेत जवळपास 250 अपंग मुलांनी बुधवारी मुंबईत आपल्या कलेचे सादरीकरण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्या विक्टरी आर्ट फाऊंडेशन अंतर्गत भारतातील 12 हजार अपंग मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई तसेच मुंबई बाहेरील अनेक सामाजिक संस्थांमधील अपंग मुलांनाही शामक स्वत: नृत्याचे प्रशिक्षण देतो. 


बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात या विविध प्रकारे अपंग असलेल्या मुलांनी अगदी व्हिलचेअरवर बसून आपल्या कलेचे सादरीकरण केले. 


अद्भूत भारत ही थीम घेत यावर्षी या मुलांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमात मुलांसोबत त्यांच्या प्रशिक्षकांनीही परफॉर्मन्स दिले. या कार्यक्रमात काही मुलांनी आपली विशेष मोहोर उमटवली.


23 वर्षीय शेहनवाझ शेख हा पायाने अपंग आहे. शामकच्या डान्स थेरपी क्लासेससाठी तो प्रशिक्षक म्हणून कामही करतो. शुभम पेट्टी हा पायने अपंग, ठेंगणा तसेच अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त आहे. 


शहनवाझ व शुभम सारख्या अनेक मुलांनी एकत्रितपणे एकापेक्षा एक सादरीकरण यावेळी केले. डान्स नेहमीच थेरोपेटिक व व्यक्तिमत्त्व विकास करणारे माध्यम आहे, असे यावेळी कोरिओग्राफर शामक दावरने सांगितले. जिथे इच्छा तिथे मार्ग याची प्रचिती आणून देणारी ही मुलं खरंच सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत.