BJP MLA Allegations against SRK and Deepika Padukone: बिहारमधील भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार (MLA) हरी भुषण ठाकूर बचाऊल (Hari Bhushan Thakur Bachaul) यांनी बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) वादग्रस्त विधान केलं आहे. ठाकूर यांनी शाहरुखला 'पीएफआय'चा (PFI Agent) एजंट म्हटलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' चित्रपटामध्ये शाहरुखबरोबर मुख्य भूमिकेत दिसत असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दलही (Deepika Padukone) ठाकूर यांनी 'ती तुकडे तुकडे गँगची (Tukde Tukde Gang) सदस्य आहे', असं म्हटलं आहे.


भगवा रंग बलिदानाचं प्रतिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"भगवा रंग हा बलिदान आणि तपस्येचं प्रतिक आहे. मात्र तुकडे-तुकडे गँगची सदस्य असलेल्या दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची अंतर्वस्त्र परिधान केली. दीपिका केवळ जेएनयूमध्ये का गेली होती?" असा प्रश्न ठाकूर यांनी विचारला आहे. "अशाप्रकारच्या घटना भारतामधील अनेक भागांमध्ये घडल्या होत्या. या चित्रपटाशी संबंधित लोक हे आयएसचे सदस्य आहेत. तसेच ते घजवा-ए-हिंदला समर्थन करतात," असंही ठाकूर म्हणाले आहेत. 


जानेवारी 2020 मध्ये दीपिका गेलेली जेएनयूमध्ये


दीपिका पादुकोणने 9 जानेवारी 2020 रोजी जेएनयुला भेट दिली होती. यावेळी तिने जेएनयुमध्ये झालेल्या हिंसेदरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन दर्शवण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावरुन बराच वाद झाला होता आणि दीपिकाच्या या भेटीचा थेट फटका 'छपाक' चित्रपटाला बसला होता. 


शाहरुख पीएफआयचा एजंट


ठाकूर यांनी दीपिकाबरोबरच शाहरुखबद्दलही वादग्रस्त विधान केलं आहे. "शाहरुख खान हा पीएफआयचा एजंट आहे. चित्रपटनिर्मात्यांनी हिंदूचा अपमान करण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे," असा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. पॉप्युलर फ्रण्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पाच वर्षांची बंदी घातलेली संघटना आहे. 'पठाण' चित्रपटामधील 'बेशर्म रंग' गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये दीपिका भगव्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे या चित्रपटाला अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. अनेकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवल्याने सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटामधील वादग्रस्त भाग वगळण्याच्या सूचना निर्मात्यांना केल्या होत्या. 


बिहारमध्ये तुफान प्रतिसाद


एकीकडे भाजपाच्या बिहारमधील आमदाराने अशी गंभीर विधानं केलेली असताना दुसरीकडे तिकीटबारीवर 'पठाण'ला तुफान प्रतिसाद राज्यात मिळत आहे. अनेक ठिकाणी 'पठाण'चे शो हाऊसफूल असल्याचं दिसून येत आहे.


मोदींनी दिलेली समज


काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटांसंदर्भात वाग्रस्त विधानं करणाऱ्यांना समज दिली होती. अशाप्रकारची विधानं करु नये असं मोदींनी म्हटलं होतं. या चित्रपटांबद्दल नेतेमंडळी भाष्य करतात आणि दिवसभर त्यावरुन बातम्या सुरु राहतात. या गोष्टींमुळे पक्षाचा विकासाच्या अजेंड्यासंदर्भातील गोष्टींबद्दल चर्चा होत नाही आणि त्याचा फटका बसतो असं पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये म्हटल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.