2022 मध्ये सर्कस चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, तुफान कमाई करत आहे. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिव्हर्समधील हा पाचवा आणि सिंघम फ्रॅचाईजीमधील तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात भली मोठी स्टारकास्ट आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत असून त्याच्यासह अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करिना कपूर, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ देखील चित्रपटात आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला हा चित्रपट सुपरहिट झाला असून फक्त 10 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सहाव्यांदा ऑनस्क्रीन एकत्र आले आहेत. याआधी रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, 83 आणि सर्कस चित्रपटात ते एकत्र दिसले होते. 'सिंघम अगेन' चित्रपटात दोघांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्या तरी एकत्र एकही सीन नाही. नुकतंच रोहित शेट्टीने SHOWSHA ला दिलेल्या मुलाखतीत यामागील कारण सांगितलं. दोघांना एकत्र दाखवण्याची संधी असतानाही ती का टाळली याचं कारण रोहित शेट्टीने सांगितलं आहे. 


"खरं तर मला हे करायला आवडलं असतं. पण आम्ही रामायणाचा संदर्भ घेतला होता आणि रणवीरला हनुमानाच्या भूमिकेत दाखवलं होतं. तो हनुमान यांचं प्रतिबिंब होता, त्यामुळे आमच्यासाठी ते चुकीच्या प्रकारे गेलं असतं. आम्ही त्याबद्दल चिंताग्रस्त होतो," असं रोहितने सांगितलं. पुढे त्याने सांगितलं की, "सेटवर प्रत्येकजण जर आपण अक्षय कुमार आणि रणवीरमधील कॉमेडी सीन दाखवू शकतो तर मग रणवीर-दिपिकामध्ये का दाखवू शकत नाही? असं विचारत होतं. ते चांगल्या प्रकारे करु शकलो असतो पण तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता".


पुढे तो म्हणाला की, "अनेक गोष्टी या जाणीवपूर्वक करण्यात आल्या होत्या, जसं की आपण हे करु शकत नाही, किंवा हे वाक्य बोलू शकत नाही'. अन्यथा आम्ही नक्कीच दोघांमधील एक सीन दाखवला असता. पण ते चुकीच्या प्रकारे गेलं असतं आणि मला त्याबाबतीत कोणतीही तडजोड करु इच्छित नव्हतो".


सिंघम अगेन, दिवाळीत (1 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला, चित्रपटातील पात्रांना रामायणातील पात्रांशी जोडण्यात आलं आहे. अजय देवगण आणि करीना कपूर यांना प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांचं प्रतिबिंब दाखवण्यात आलं. अक्षय कुमार जटायूच्या भूमिकेत, रणवीरला भगवान हनुमानाचे प्रतिबिंब आणि अर्जुन कपूर, जो चित्रपटात करीनाचे अपहरण करतो, रावणाच्या रूपात दाखवण्यात आलं. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून चित्रपटात कोणत्याही गाण्याचा समावेश करण्यात आला नाही.


चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी CBFC च्या आदेशानुसार अनेक दृश्यांमध्ये बदल करण्यात आले होते. चित्रपटातून सुमारे 7.12 मिनिटांचे फुटेज काढून टाकण्यात आले. अहवालानुसार, सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना भगवान रामाच्या चरणांना स्पर्श करताना सिंघमच्या 23-सेकंद लांबीच्या दृश्यात योग्य बदल केले. तसंच रावण सीतेला पकडत आहे, खेचत आहे आणि ढकलत आहे हे 16-सेकंदाचे दृश्य हटवण्यास सांगण्यात आलं. चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरच्या पात्रांभोवती इतर अनेक बदल करण्यात आले होते. सुदैवाने आतापर्यंत चित्रपट कोणत्याही वादात अडकलेला नाही.