`कबीर सिंग`विरोधात डॉक्टरची तक्रार
जाणून घ्या यामागचं नेमकं कारण
मुंबई : 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाच्या धर्तीवर अगदी त्याच कथानकावर भाष्य करणारा 'कबीर सिंग' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहिद कपूरची मध्यवर्ती भूमिका असणारा हा चित्रपट समीक्षकांना फारसा रुचला नाही. पण, प्रेक्षकांनी मात्र या प्रेमाच्या नशेत उध्वस्त झालेल्या 'कबीर सिंग'ला चांगलीच पसंती दिली आहे.
शाहिद कपूरच्या करिअरला कलाटणी देणारा आणि एका नव्या उंचीवर नेणाऱा चित्रपट म्हणून 'कबीर सिंग'कडे पाहिलं जात आहे. शंभर कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या चित्रपटाच्या वाटेत मात्र एक अडथळा आल्याचं कळत आहे.
मुंबईस्थित एका डॉक्टरने या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून डॉक्टरांची प्रतिमा मलिन केली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शाहिद कपूर या चित्रपटात अतिशय हुशार पण, तरीही प्रेमभंग झालेल्या, मद्य आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या डॉक्टरच्या भूमिकेत झळकत आहे. एका अशा डॉक्टरची व्यक्तीरेखा तो साकारत आहे, जो त्याच्या वेदना दूर सारण्यासाठी या साऱ्या चुकीच्या मार्गांचा आधार घेत असतो. पण, त्याच्या या कृती डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याचा आरोप या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
इतकच नव्हे, तर तक्रारकर्त्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्री, माहिती व प्रसारण मंत्रालय, राज्य आरोग्य मंत्रालय, सेन्सॉर बोर्ड आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिण्यात आलं आहे. ज्या माध्यमातून चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉक्टरांना अतिशय नकारात्मक नतरेतून चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे, असं सांगत 'कबीर सिंग' या चित्रपटाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर आता पुढे कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.