Sexual Abuse In TV Industry: छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री काम्या पंजाबीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये टीव्ही आणि मालिका क्षेत्र हे काम करण्यासाठी सर्वात सुरक्षित क्षेत्र असल्याचा दावा केला आहे. या क्षेत्रामध्ये लैंगिक अत्याचार किंवा कास्टींग काऊचसारखे प्रकार होत नाहीत असंही या अभिनेत्रीने म्हटलं आहे. काम्याने 'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "टीव्ही मालिकेचं क्षेत्र फार साफ आहे. पूर्वी काय व्हायचं मला ठाऊक नाही मात्र आता कास्टींग काऊच होत नाही," असं म्हटलं आहे.


सर्वात सुरक्षित क्षेत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे मनोरंजन क्षेत्र म्हटल्यानंतर अनेकदा भूमिकेसाठी कॉम्प्रमाइज करावं लागेल असं गृहित धरलं जातं. मात्र कामाया पंजाबीने किमान टीव्ही क्षेत्राशी संबंधित ठिकाणी असं काहीही होत नसल्याचा दावा केला आहे. "तुम्ही भूमिकेसाठी योग्य ठरत असाल आणि तुम्ही टॅलेंटेड असाल तर तुम्हाला मालिकेसाठी निवडलं जातं. मला वाटतं की टीव्ही मालिका क्षेत्र हे सर्वात सुरक्षित क्षेत्र आहे. इथे लैंगिक छळासारखे प्रकार होत नाही. हे काही होतं ते एकमेकांच्या सहमतीने होतं. इथे कोणी कोणाला भूमिका देतो म्हणून सोबत झोपायला सांगत नाही," असंही काम्याने म्हटलं आहे.


काही जण स्रीलंपट असतात पण...


काही कलाकार नक्कीच महिलांच्या मागे लागतात अशी कबुलीही काम्याने या मुलाखतीत दिली. "काही कलाकार स्रीलंपट आहेत हे खरं पण तुम्ही वेळीच हे थांबवं आणि स्पष्टपणे सांगितलं तर अशा गोष्टी होत नाहीत. कोणालाही यासाठी बळजबरी केली जात नाही. तुम्हाला हात लावला जाईल आणि तुम्ही अनकम्पर्टेबल व्हाल असं इथे होत नाही. तुम्ही थेट, 'हे मला आवत नाही' असं सांगितलं तर तुम्हाला कोणी स्पर्शही करत नाही," असं काम्या म्हणाली.


मुलीची इच्छा नसेल तर...


"मुलींमध्ये वेडे झालेले अभिनेतेही आम्ही पाहिले आहेत. मात्र कोणी कोणावर बळजबरी करत नाही. मला असे लोक ठाऊक आहे ज्यांनी त्यांच्याबरोबर बळजबरी झाल्याचा दावा केला आहे. मात्र जर मुलीची इच्छा नसेल तर तसलं काही होत नाही. किमान टीव्ही मनोरंजन क्षेत्रात तरी हे होत नाही. मला चित्रपट आणि ओटीटीबद्दल कल्पना नाही मात्र टीव्ही हे नक्कीच होत नाही," असं काम्याने सांगितलं.


अनेक मालिकांमधून झळकली


काम्या पंजाबी 'बनू मे तेरी दुल्हन,' 'परवरीश - कुछ खट्टी कुछ मिठी' आणि 'मर्यादा : लेकीन कब तक' यासारख्या मालिकांमधून झळकली आहे. तिने प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सातव्या पर्वामध्ये स्पर्धक म्हणूनही सहभाग नोंदवला होता.