मुंबई :  स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला 'गोष्ट एका पैठणीची"चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात. काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी.. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. या चित्रपटाचा तरल असा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन पैठणीची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.



चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नाची झलक दिसत असून, त्यामुळे हा टीझर समस्त महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही. लवकरच आता हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.