...म्हणून प्रदर्शनापूर्वीच `झिरो` चित्रपट अडचणीत
`झिरो` प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट 'झिरो' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये बनियानमध्ये असलेल्या शाहरुखच्या गळ्यात नोटांची माळ आणि शीखांकडून परिधान करण्यात येणारि किरपाण दिसते.
हीच बाब अधोरेखित करत चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरवर आक्षेप घेत शिखांच्या भावना दुखावल्याचा आरोप अमर्तपाल सिंग खालसा नामक वकिलाने केला आहे. सोबतच त्यांनी सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ३० नोव्हेंबरला याचिकेवर सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालयाकडून या प्रकरणी नेमका कोणता निर्णय दिला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, शाहरुखने किरपाण धारण केली नसून ती कट्यार असल्याचं स्पष्टीकरण चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आलं आहे. त्याशिवाय चित्रपट साकारतेवेळीच कोणत्याही धर्म- पंथाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती असंही चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.