हॉलिवूड अभिनेता उत्स्फूर्तपणे `गणपती बाप्पाssss मोरया` म्हणतो तेव्हा...
चाहत्यांच्या आनंदाला उधाण
मुंबई : सहसा मुंबईत आलं की किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोप्यात गेलं की काही आवाज हे हमखास कानांवर पडतात. त्याच आवाजांपैकी एक म्हणजे 'गणपती बाप्पा मोरया' हे उदगार. गणेशोत्सवाच्याच दिवसांमध्ये नव्हे, तर इतरही अनेक दिवशी कोणा एका शुभकार्याच्या शुभारंभाच्या वेळी, एखाद्या प्रवासाला निघताना किंवा अगदी सहजही अनेकदा गणपती बाप्पा मोरया, असं उत्स्फूर्तपणे म्हटलं जातं.
हे म्हणत असताना अगदी मनापासून काही भावना व्यक्त होत असतात. अशाच अंदाजात एका हॉलिवूड अभिनेत्यानेही 'गणपती बाप्पाssss मोरया' असा घोष केला आहे. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. निमित्त आहे ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ.
एक जुना व्हिडिओ खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये हॉलिवूड अभिनेता ब्रॅडली कूपर हा चक्क गणपती बाप्पा मोरया म्हणताना दिसत आहे. Silver Linings Playbookच्या इंडियन प्रिमियरसाठी एका मित्राने शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ पाठवल्याचं खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं. सोबतच त्याने ज्या पद्धतीने गणपती बाप्पा म्हटलं आहे... हे पाहायला विसरु नका असंही खेर यांनी या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट होताच, खेर यांच्या सांगण्यानुसार चाहत्यांनी ब्रॅडलीचा हा अंदाज पाहिला आणि त्याला भरभरुन दादही दिली.