मुंबई : राजस्थानातील जोधपूर येथे असणाऱ्या उमेदभवन पॅलेस या वास्तूत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींनी या दोघांनी सहजीवनाची शपथ घेतली. देसी गर्ल आणि तिचा परदेशी नवरदेव यांनी या नव्या प्रवासाला सुरुवात करताच उमेदभवन परिसरात मोठ्या प्रमाणात आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झाल्यानंतर एका वेगळ्याच अंदाजात जणू ही ग्वाहीच देण्यात आली होती. पण, याच अंदाजामुळे आता तिचा हा दिमाखदार विवाहसोहळा अडचणीत आला आहे. 'एएनआय' आणि इतरही बऱ्याच माध्यमातून उमेदभवन पॅलेस येथे करण्यात आलेल्या आतिषबाजीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला ज्यानंतर प्रियांकावर अनेकांनी निशाणा साधला. 


'देसी गर्ल'वर निशाणा साधण्यामागचं कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून खुद्द प्रियांकानेच दिवाळीदरम्यान फटाके न वाजवण्याची, प्रदूषण न करण्याची विनंती सर्वांना केली होती. 


आपल्यासारख्या अनेकांनाच ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना नीट श्वास घेता यावा, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तिने ही विनंती केली होती. पण, स्वत:च्याच लग्नात इतक्या मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्याला प्राधान्य दिल्यामुळे ती अडचणीत आली. 


मुख्य म्हणजे फटाके फोडल्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस जोधपूरमध्ये हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळ किती हा ढोंगीपणा, असंच म्हणत प्रियांकाचा जुना व्हिडिओ पोस्ट करत तिची ही चूक अनेकांनीच लक्षात आणून दिली. 







आमचं संपूर्ण शहरही इतके फटाके वाजवत नसेल, असं म्हणत काहींनी तिच्यावर निशाणा साधला. तर, दिवाळीत फटाके फोडले तर त्याचा श्वसनास त्रास होतो; पण, लग्नात फटाके फोडल्यामुळे जणू हवेत प्राणवायूच मिसळला जात आहे, असं उपरोधिक ट्विटही एका युजरने केलं. सोशल मीडियावरुन चाहत्यांनी आळवलेला नाराजीचा सूर पाहता आता प्रियांका यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.